Advertisement

अवघ्या दोन मिनिटांत होईल, दूध का दूध अन् पानी का पानी


अवघ्या दोन मिनिटांत होईल, दूध का दूध अन् पानी का पानी
SHARES

पांढऱ्या दुधाची काळी कहाणी... स्वार्थासाठी केवळ पैसा कमावण्यासाठी दुधात पाणी, स्टार्च आणि बरंच काही मिसळणारे भेसळखोर ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे सकाळी-सकाळी घरात येणारे दूध भेसळयुक्त तर नाही ना? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना नक्कीच सतावत असेल. पण आता चिंता करू नका, तुम्हालाही घरबसल्या दुधातील भेसळ ओळखता येईल, तीसुद्ध अवघ्या दोन मिनिटांत...

अऩ्न आणि औषध प्रशासना (एफडीए) च्या माध्यमातून पुण्यातील काही शास्त्रज्ञांनी माफक दरातील दूधपट्टी तायर केली असून या दूधपट्टीद्वारे दुधातील भेसळ सहजरीत्या ओळखता येणार आहे. लवकरच ही दूधपट्टी विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती 'एफडीए' आयुक्त डाॅ. हर्षदिप कांबळे यांनी दिली आहे. या दूधपट्टीची किंमत 50 रुपये असून ती आणखी स्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती ही दूधपट्टी तयार करणाऱ्या 'राईट टू रिसर्च फाऊंडेशन'चे संस्थापक डाॅ. जयंत खंदारे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिला आहे.

या दूधपट्टीचे सादरीकरण अर्थात 'डेमो' नुकताच 'एफडीए' मंत्री गिरीष बापट यांच्यासमोर करण्यात आले आहे. येत्या आठवड्याभरात 'एफडीए' अधिकारी आणि प्रसारमाध्यमांपुढे या दूधपट्टीचा 'डेमो' घेण्यात येईल, असेही डाॅ. कांबळे यांनी सांगितले.

Advertisement

अशी तयार झाली दूधपट्टी -
दूधभेसळ रोखण्यासाठी 'एफडीए' कारवाई करतच आहे. पण ग्राहकांनाही दूधभेसळ ओळखता यावी आणि त्याद्वारे भेसळखोरांना वचक बसावा यासाठी परवडणाऱ्या दरात दूधभेसळ रोखणारे यंत्र तयार करता येते का? याचा विचार मागील अनेक वर्षांपासून 'एफडीए' करत होते. त्यानुसार गेल्या वर्षी 'एफडीए'ने 'राईट टू रिसर्च फाऊंडेशन'कडे हे काम दिले आणि एका वर्षांच्या प्रयत्नानंतर डाॅ. खंदारे आणि त्यांच्या टीमने परवडणाऱ्या दरातील दूधपट्टी तयार केली.

या दूधपट्टीचे पेटंट घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही दूधपट्टी ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध होईल. यासाठी किमान तीन महिन्यांचा काळ लागेल, असे डाॅ. खंदारे यांनी सांगितले.

Advertisement

अशी ओळखा दूधभेसळ -
या दूधपट्टीद्वारे युरीया, क्षार, हायड्रोजन पॅराॅक्साईड आणि ग्लुकोज अशी चार प्रकारची दुधातील भेसळ ओळखता येईल. त्यासाठी एका पाकिटात चार दूधपट्ट्या असतील.

  • जांभळ्या रंगाच्या पट्टीवर दुधाचे दोन थेंब टाकल्यास ती पट्टी गडद निळी झाल्यावर दुधात हायड्रोजन पॅराॅक्साईडचे प्रमाण जास्त असल्याचे सिद्ध होईल.
  • पिवळ्या रंगाच्या पट्टीवर दुधाचे दोन थेंब टाकल्यास पट्टी गुलाबी वा लाल झाली की त्यात युरीयाचे प्रमाण अधिक असल्याचे समजावे.
  • त्याचवेळी करड्या रंगाची पट्टी निळी झाल्यास त्यात क्षार तर पांढरी पट्टी करडी झाल्यास त्यात ग्लुकोजचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक अर्थात दुधात भेसळ असल्याचे समजावे.
  • प्रत्येक पट्टीनुसार भेसळ ओळखण्यासाठी 30 सेकंदाप्रमाणे दोन मिनिटे लागणार असल्याचेही डाॅ. खंदारे यांनी स्पष्ट केले.

दूध घेतानाच ही चाचणी केली तर तिथल्या तिथे दूधभेसळ रोखता येईल, असे म्हणत डाॅ. कांबळे यांनी ही दूधपट्टी ग्राहकांच्या खूपच फायद्याची ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा