Advertisement

तुम्ही वापरलेलं तेल जेवणासाठी वापरत नाही ना?


तुम्ही वापरलेलं तेल जेवणासाठी वापरत नाही ना?
SHARES

रोजचं जेवण तयार करण्यासाठीचा महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल. अगदी रोजच्या फोडणीपासून ते चमचमीत तळलेले पदार्थ खाण्यासाठी खाद्यतेल वापरलं जातं. पण जर तुम्ही रोज वापरत असलेलं खाद्यतेल वापरलेलं आणि भेसळयुक्त असेल तर? हो, असं असू शकतं. 

वापरलेलं खाद्यतेल तुम्ही विकत घरात आणलेलं असू शकतं. कारण वापरलेलं तेल हॉटेल, उपहारगृह आणि स्टॉलवरून जमा करून ते पुन्हा नव्यानं रिपॅक करत विकण्याचा गोरखधंदा सध्या मुंबईत जोरात सुरू आहे. अशाच एका वापरलेलं खाद्यतेल पुन्हा रिपॅक करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नुकताच अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)नं केला आहे.


एफडीएची कारवाई

खाद्यपदार्थ तळून झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर तेल शिल्लक राहतं. हे शिल्लक राहिलेलं तेल मोठ्या हॅटेल, उपहारगृह आणि स्टॉलधारकांकडून जमा करून ते रिपॅक करून विकण्याचा गोरखधंदा साकीनाका इथं एका टोळीकडून सुरू असल्याची गुप्त माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मे. कृष्णा ट्रेडिंग साकीनाका, या दुकानावर बुधवारी सापळा रचत छापा टाकला.

Advertisement


कशी करायचे तेलाची भेसळ

यावेळी नितीन प्रविण भानूशाली नावाची व्यक्ती खाद्य तेलाची भेसळ करत असल्याचं आढळून आली. नितीन हा त्या परिसरातील विविध हॉटेल आणि इतर अन्न पदार्थांच्या स्टॉलवरून तळण्यासाठी वापरण्यात आलेलं असं शिल्लक खाद्यतेल जमा करून ते रिफाइन राईस ब्रॅन आईलमध्ये 30 टक्के करून रिपॅक करून ते विक्रीसाठी पाठवत असल्याचं आढळून आल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त (अन्न), बृहन्मुंबई, एफडीए यांनी दिली आहे.


'तेल खरेदी करताना काळजी घ्या'

नितीन भानूशालीला अटक करण्यात आली असून तेलाचे नमुने एफडीएकडून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या दुकानातून एफडीएनं 3566.8 कि. ग्रॅ. चं आणि 2,30,342 रुपये किंमतीचं, असं भेसळयुक्त-वापरलेलं तेल जप्त केलं आहे. याप्रकरणी पुढील तपासणी सुरू आहे. पण असं भेसळयुक्त-वापरलेलं खाद्यतेल वापरणं हे शरिरास अपायकारक ठरू शकतं. त्यामुळं तेल खरेदी करताना काळजी घ्या, असं आवाहन एफडीएनं केलं आहे.

Advertisement
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा