बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ येथे‘प्राणिपाल’ (Animal Keeper) पदावर कार्यरत असणारे गुरुनाथ नार्वेकर यांना ‘प्राणिमित्र पुरस्कार २०२०’ देऊन आज गौरविण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्याद्वारे ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळयात नार्वेकर यांना केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आला आहे. देशभरातील १५१ प्राणिसंग्रहालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून ४ कर्मचाऱयांची निवड यंदाच्या पुरस्कारासाठी करण्यात आली असून यामध्ये नार्वेकर यांचा समावेश आहे.
हेही वाचाः- १५ आॅक्टोबरपासून शाळा उघडणार, सरकारच्या गाइडलाइन्स जारी
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात देशभरातील सर्व प्राणिसंग्रहालयांमध्ये ‘वन्यजीव सप्ताह’साजरा केला जातो. या वर्षी वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने ‘केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली’ यांच्यामार्फत प्राणिसंग्रहालयांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱया कर्मचाऱयांची सन्मान पूर्वक दखल घेतली जावी, या उद्देशाने यंदाच्या वन्यजीव सप्ताहापासून ‘प्राणिमित्र पुरस्कार’ देण्यात येत आहेत. या अंतर्गत प्राणिसंग्रहालयातील विविध पदांवर कार्यरत ४ कर्मचा-यांना ‘प्राणिमित्र पुरस्कार’प्रदान करण्यात आले असून यामध्ये ‘प्राणिपाल’ पदावर गेली तब्बल ३० वर्षे कार्यरत असणाऱ्या गुरुनाथ नार्वेकर यांचा समावेश आहे.
हेही वाचाः- हा तर मुंबई पोलिसांच्या बदनामीचा कट- संजय राऊत
प्राणीपाल या पदावर कार्यरत असताना नार्वेकर यांनी गेल्या ३० वर्षांमध्ये विविध प्राणी-पक्ष्यांची सेवा केली आहे. तर ‘पशुवैद्यकीय व्रणोपचारक’पदी पदोन्नती मिळाल्यानंतर नार्वेकर यांनी प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांची आरोग्यविषयक देखभाल, औषधोपचार आदी कामे करतानाच सध्याच्या ‘कोविड-१९’साथरोगाच्या काळात देखील एकही दिवस सुट्टी न घेता प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांविषयीच्या सर्व जबाबदा-या उत्तमरित्या पार पाडल्या आहेत. डिसेंबर २०२० मध्ये महापालिकेतून सेवानिवृत्त होत असलेले गुरुनाथ नार्वेकर यांना त्यांनी केलेल्या अविरत सेवेकरिता त्यांना सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.