मध्य रेल्वेच्या 6 रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिट बंद करण्यात आले आहे. 16 मार्चपर्यंत ही तिकिट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
होळीच्या काळात रेल्वे स्थानकांवरील वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), ठाणे, कल्याण आणि पनवेलसह प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, "नियमित आणि विशेष गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांमुळे होणारी गर्दी नियंत्रित करणे हा यामागचा उद्देश आहे."
तथापि, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांसाठी सूट देण्यात आली आहे.
दरवर्षी, हजारो लोक होळीच्या वेळी मुंबईतून कोकण, दक्षिण-पूर्व भारत आणि उत्तर भारतात प्रवास करतात. प्रवाशांची वर्दळ पाहता रेल्वेने विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. यापैकी बऱ्याच गाड्या आधीच कार्यान्वित झाल्या आहेत. तर येत्या काही दिवसात आणखी काही गाड्या सोडण्यात येणार आहेत. ही गर्दी सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी एक आव्हान आहे, कारण जास्त गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवू शकते.
"अशा घटना टाळण्यासाठी, मध्य रेल्वेने प्रमुख स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. उपायांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत निरीक्षण करणे, प्रवाशांना जास्त वेळ थांबू नये असे आदी गोष्टींची खबरदारी घेतली जात आहे," अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.