मुंबई - महालक्ष्मी येथे विजेच्या तारेला अडकलेल्या कावळयाचा जीव वाचवताना मृत पावलेल्या अग्निशमन दलाचा जवान राजेंद्र भोजनेंना बुधवारी महापालिका सभागृहात केवळ श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, भोजने यांना ना हुतात्म्याचा दर्जा देण्याची मागणी झाली ना त्यांना अर्थसहाय्य देण्याची मागणी करण्यात आली.
महालक्ष्मी येथे तारेला अडकलेल्या कावळयाची सुटका करण्यास गेलेल्या तीन अग्निशमन जवानांना विजेचा झटका लागला होता. त्यात तिघेही जखमी झाले होते. भाजलेल्या स्थितीत या तिन्ही जवानांना प्रथम व्होकार्ट आणि त्यानंतर नवी मुंबईतील नॅशनल बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथे उपचार सुरु असतानाच राजेंद्र भोजने यांचा 3 दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे कर्तव्य निभावत असताना मृत्यू झालेल्या या जवानाला हुतात्मा म्हणून घोषित करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
दरम्यान महापालिकेतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्र भोजनेंचा उल्लेख हुतात्मा म्हणून केला होता. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्थसहाय देण्याची सूचना केली होती. त्यामुळे भोजने यांना हुतात्मा म्हणून घोषित करण्याचे पत्र तथा मागणी महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडून होणे अपेक्षित होते. पण तशी मागणी किंवा त्यांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा महापौर किंवा विरोधीपक्षांनी केली नाही.
बुधवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भोजने यांना केवळ श्रद्धांजली वाहण्यात आली. यापूर्वी गोकुळ इमारत आग दुर्घटनेत कर्तव्य निभावताना मृत्यू पावलेल्या सुनील नेसरीकर, सुधीर अमीन सह अधिकारी आणि जवान यांना शासनाने हुतात्मा घोषित केलेले आहे.