वसई, विरार (virar) शहरामधील अनेक तलावांची अवस्था फारच बिकट बनली आहे. त्यांचे योग्यरित्या संवर्धन व स्वच्छता होत नसल्याने तलाव (lakes) आता प्रदूषित झाले असल्याचे दिसून येत आहे.
शहरात अनेक जुनी व ऐतिहासिक तसेच नैसर्गिक सौंदर्याने बहरलेले तलाव आहेत. या तलावांचे संवर्धन व्हावे यासाठी पालिका तलावांचे पुनरुज्जीवन करून त्याचे टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येत आहेत.
शहरात शंभराहून अधिक तलाव असून अनेक तलाव सुशोभीत करून विकसित केले आहेत. मात्र त्यानंतर त्या तलावांचे संवर्धन व स्वच्छतेकडे पाठ फिरवली असल्याने शहरातील अनेक तलाव प्रदूषित (pollution) झाले आहेत.
लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार वसईतील कामण, चुळणे, माणिकपूर, गोखीवरे, आचोळे यासह विविध भागात तलावांची दयनीय अवस्था झाली आहे. सद्यास्थितीत तलावात मोठ्या प्रमाणात कचरा, शेवाळ, गाळ, जलपर्णी तयार झाली आहे.
वसई विरार महापालिकेकडून (vvmc) तलावांची स्वच्छता न केल्याने त्या तलावातील पाणीसुद्धा पूर्णत: दूषित झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
चुळणे येथील निसर्गरम्य तलावाची फारच अवस्था बिकट झाली आहे. तलावात गवत व कचरा साचून त्यातील पाणी प्रदूषित झाले आहे, असे येथील सामाजिक कार्यकर्ते जॅक गोम्स यांनी सांगितले आहे.
वसई पूर्वेच्या (vasai road) गोखीवरे येथील तलावात गटाराचे व आजूबाजूचे सांडपाणी येत असल्याने त्या तलावांची स्थिती वाईट झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
दरम्यान, तलाव संवर्धनाच्या दृष्टीने विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. जे तलाव अस्वच्छ आहेत ते सुद्धा स्वच्छ केले जातील, असे उपायुक्त (वृक्ष प्राधिकरण व उद्याने) समीर भूमकर यांनी सांगितले.
हेही वाचा