राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असल्याने बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे. कोरोनाबाबत घालून देण्यात आलेले निर्बंध आणि नियमांचं कडक पालन होणार नसेल, तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवण्याचा प्रयत्न करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी प्रशासनाला दिले आहेत.
टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसंच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर सोमवारी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसंच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी. खासगी कार्यालये व आस्थापना ५०टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील, तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या.
एकीकडे आपण कोविड (covid19) परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचं पालन होत नाही. विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत. बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचं पालन होताना दिसत नाही.
शेवटी लोकांच्या आरोग्याचं संरक्षण करणं याला आमचं प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचं पालन करावं अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असं समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले.
हेही वाचा- मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख पार
या बैठकीच्या प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे (coronavirus) बेड्स, व्हेंटिलेटर, व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत, अशी परिस्थिती असल्याचं सांगितलं.
ते म्हणाले की, सध्या ३ लाख ५७ हजार आयसोलेशन खाटापैकी १ लाख ७ हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. ६० हजार ३४९ ऑक्सिजन खाटापैकी १२ हजार ७०१ खाटा, १९ हजार ९३० खाटापैकी ८ हजार ३४२ खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. ९ हजार ३० व्हेंटिलेटर्सपैकी १ हजार ८८१ वर रुग्णांना ठेवण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच होत नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता कमी पडते आहे.
वेळीच चाचणी न केल्याचे गंभीर परिणाम
गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात (maharashtra) ३ लाख सक्रिय रुग्ण होते आणि ३१ हजार ३५१ मृत्यू झाले होते मात्र २७ मार्च रोजी ३ लाख ३ हजार ४७५ सक्रिय रुग्ण असून मृत्यूंची संख्या ५४ हजार ७३ झाल्याने चिंता वाढली आहे. विशेषत: संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्य वाढू शकतात आणि यामागे वेळेवर चाचणी न करून रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणं तसंच होम आयसोलेशनमध्ये असतानाही नियमांचं पालन न करणं ही कारणे असू शकतात, असंही टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी निदर्शनास आणलं.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका दिवशी २४ हजार ६१९ रुग्ण आढळले होते. २७ मार्च रोजी एका दिवशी ३५ हजार ७२६ रुग्ण आढळले असून ही संख्या येत्या २४ तासांत ४० हजार झालेली असेल, अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली.
(maharashtra cm uddhav thackeray warns to impose lockdown due to increasing covid 19 patients)