सोमवारची सकाळ ही मिर्जा कुटुंबीयांसाठी धक्कादायक होती. सकाळी अचानक नसीम मिर्जा यांना फोन आला. त्यांना कळलं की साकीनाका येथील खैराणे रोडवरील फरसाण दुकानात काम करणाऱ्या आपल्या मुलाचा आणि पुतण्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. हे ऐकताच नईम मिर्जाचे वडील नसीम यांनी आधी दुकान गाठलं. पण, तिथे गेल्यावर कळलं की सर्व काही आगीच्या डोंबात राख झालं आहे.
सोमवारी पहाटे भानू फरसाण दुकानात लागलेल्या आगीत नईम मिर्जा (१८) आणि वसीम मिर्जा (२१) या दोन्ही चुलत भावांचा होरपळून मृत्यू झाला. हे दोघेही गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून एकत्र काम करत होते. नईम याचं लग्न देखील ठरलं होतं, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
सकाळी आम्हाला फोन आला आम्ही तसंच दुकानात गेलो. पण, तिथून आम्हाला रुग्णालयात पाठवलं. आधी मृतदेह ओळखता येत नव्हता. पण, मी वसीमला ओळखलं. आणि थोड्यावेळाने मुलाला ओळखलं.
- नसीम मिर्जा, नईम मिर्जाचे वडील
नसीम काम करत असलेल्या फॅक्टरीचे मालक जावेद शेख यांनी सांगितलं की, नसीमला फोन आल्यानंतर तो जमिनीवरच कोसळला. आम्ही तत्काळ रूग्णालयात आलो. या सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी दुकानातील सुपरवायझर रोझ अली यांना बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर मृतदेहांची ओळख पटायला मदत झाली. तसंच आता आम्हांला त्यांचा मृतदेह मिळाला आहे. आम्ही आता त्यांना मूळ गावी म्हणजेच उत्तरप्रदेशला घेऊन जाणार आहोत.
डॉक्टरांच्या अंदाजानुसार, आग लागली तेव्हा हे कर्मचारी जागेच होते. आगीच्या धुरामुळे श्वास गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे शरीर आगीत जळालं.
हेही वाचा-
साकीनाका दुघर्टनेची चौकशी करण्याचे महापौरांचे आदेश
मी वाचलो पण, भाऊ गमावला, आगीतून वाचलेल्या अखिलेश तिवारीची कहाणी