Advertisement

मुंबईतील पहिला सेफ स्कूल झोन तयार, अपघात रोखण्यासाठी फायदेशीर

भायखळा इथं महापालिकेनं मुंबईतील पहिला सेफ स्कूल झोन तयार केला आहे.

मुंबईतील पहिला सेफ स्कूल झोन तयार, अपघात रोखण्यासाठी फायदेशीर
SHARES

भायखळा इथं महापालिकेनं मुंबईतील पहिला सेफ स्कूल झोन तयार केला आहे. भायखळा इथल्या मिर्झा गालिब मार्गावर सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा सेल्फ स्कूल झोन तयार करण्यात आला आहे.

महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांनी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय), इंडिया रॉस सेंटर यांच्या भागीदारीनं हा सेफ स्कूल झोन तयार केला आहे. हा प्रकल्प ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी यांच्यातर्फे हाती घेण्यात आला आहे.

मुंबईत बालक-स्नेही आणि चालण्याजोगे स्कूल झोन तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. मुंबई वाहतूक पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिका, तज्ज्ञ आणि स्थानिक रहिवासी एकत्र आले आणि त्यांनी रंग, बॅरिकेड्स आणि कोन्सचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला.

डिझाइन सोल्यूशनमध्ये माहितीफलकांचा वापर करून स्कूल झोन्सची आखणी करणं, रस्त्यांवर खुणा करणं, चालण्यासाठी आणि वाट पाहण्यासाठी निश्चित भाग नियुक्त करणं, पिक-अप झोन, ड्रॉप झोन यासह मल्टि-युटिलिटी (बहु-उपयुक्तता) झोन्स निश्चित करणं, खेळण्यासाठी बालकस्नेही घटकांचा अंतर्भाव करणे आणि पादचाऱ्यांसाठी ठळक क्रॉसिंग आखणे याचा समावेश आहे.

मुंबईत शाळा चालत जाण्याच्या अंतरावर असली तरी हे रस्ते चालण्याच्या दृष्टीनं सुरक्षित नसल्याचं अनेक पालक म्हणतात. त्यामुळे अनेक पालक त्यांच्या वाहनांनी मुलांना शाळेत पोहोचवतात.

मुलांसाठी रस्ते सुरक्षित केल्यानं रस्ते वापरणाऱ्या सर्वांसाठीच ते सुरक्षित कसे होतील, हे या प्रयोगातून दिसून येईल, असं समाजवादी पार्टीचे स्थानिक नगरसेवक आणि आमदार रईस शेख यांनी सांगितलं.

ई वॉर्डमधील (भायखळा) मिर्झा गालिब मार्गावर ख्राइस्ट चर्च स्कूल आणि सेंट अॅग्नेस हाय स्कूल या दोन शाळा आहेत. २०१७ ते २०१९ या तीन वर्षांच्या काळात ख्राइस्ट चर्चच्या परिसरातील ५०० मीटरच्या परिघात २३ अपघात झाले आणि ३ मृत्यू झाले आहेत. यात दोन मुलांचाही समावेश होता.

घरी परत जाताना झालेल्या अपघातात त्यांना गंभीर इजा झाली होती आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता. तसंच, २०१७ ते २०१९ या काळात मुंबईतील एकूण २ हजार ६१० शाळांपैकी २८% शाळांच्या ५०० मीटरच्या परिघामध्ये तीनहून अधिक अपघाती मृत्यू झाले आहेत.

ख्राइस्ट चर्चच्या परिसरात या शाळेतील विद्यार्थ्यांना काय पाहायला आवडेल हे जाणून घेण्यासाठी ऑक्टोबर २०१९ मध्ये डब्ल्यूआरआय इंडियानं या शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत एक कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये, त्यांना काय आवडते/आवडत नाही हे जाणून घेण्यासाठी शाळेच्या परिसरात फेरी आयोजित करण्यात आली होती.



हेही वाचा

'ती' मुंबई-पुणे विद्युत बस मुंबईकरांच्या सेवेत रूजू

मुंबईतील लसीकरणाला वेग; महापालिका स्वत: पोहोचणार लाभार्थ्यांपर्यंत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा