सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या म्हणण्यानुसार, बहुचर्चित मुंबई-गोवा महामार्ग 2026 च्या अखेरीस पूर्ण होणार आहे. ते म्हणाले की, माणगाव-इंदापूर मार्ग, चिपळूणमधील बहादूरशेख परिसरातील कोसळलेल्या उड्डाणपुलाचे काम आणि संगमेश्वर-लांजा या प्रमुख प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. ती जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
439 किलोमीटर लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गाला गेल्या काही वर्षांत अनेक विलंबांचा सामना करावा लागला आहे. महामार्गाचे बांधकाम पावसाळ्यात चर्चेचा विषय ठरतो. प्रचंड ट्रॅफिक जाम आणि खड्डे यामुळे कोकणातून प्रवास करणे कठिण झाले आहे.
भोसले म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम पूर्ण होत आहे. पण काही ठिकाणी भूसंपादन, पर्यावरण मंजुरी, कंत्राटदाराची अकार्यक्षमता, कायदेशीर वाद आणि बांधकाम आराखड्यातील शेवटच्या क्षणी बदल आदी अडचणींमुळे काम रखडले आहे.
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 17 वेळा महामार्गाला भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला होता. गणेशोत्सव 2024 पूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, चिपळूण उड्डाणपुलावरील गर्डर कोसळल्याने प्रकल्पाला आणखी विलंब झाला.
हेही वाचा