गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी समुद्रात जाण्यास महापालिकेद्वारे बंदी घालण्यात आल्याचं
वृत्त समाजमाध्यमांत प्रसिद्ध झालं होतं. मात्र, पालिकेनं हे वृत्त फेटाळलं
आहे. गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही असं स्पष्टीकरण महापालिकेनं दिलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेने काही नियमावली तयार केली आहे. यानुसार, समुद्रात गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आलेली नसली तरीही १ ते २ किलोमीटरच्या परिसरातील नागरिकांनी समुद्रात जाऊन विसर्जन करावं असं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर, चौपाटीपासून दूर राहणाऱ्या मुंबईकरांसाठी पालिकेने कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे.
मुंबईत ३४ वरून १६७ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. सोशल डिस्टनसिंग राखून कृत्रिम तलावात अधिक प्रमाणात गणेशामूर्तींचे विसर्जन करावं असं आवाहनही पालिकेनं केलं आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई महानगर पालिका आणि राज्य सरकारने नियमावली तयार केली आहे. त्यात विसर्जन मिरवणूक काढण्यावर बंदी करण्यात आली आहे. तसेच, सार्वजनिक मंडळांसाठी १० आणि घरगुती गणेशोत्सवासाठी ५ पेक्षा जास्त भाविकांना विसर्जनात सहभागी होता येणार नाही.
समुद्र किनार्यालगतच्या एक ते दोन किलो मीटरच्या परिसरात राहणाऱ्या गणेश भक्तांनी आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन हे समुद्रात करण्यास हरकत नाही. पण इतर भाविकांना म्हणजेच जे समुद्रालगत वास्तव्यास नाहीत अशा नागरिकांनी प्राधान्याने घरच्या घरी किंवा कृत्रिम तलावातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे अशा सूचना महापालिका प्रशासनानं केल्या आहेत.
हेही वाचा-
Raj Thackeray: लॉकडाऊन हवं का नको? मनसेनं सुरू केलं सर्वेक्षण
IPL मध्ये
खेळण्याची संधी हुकल्याने मालाडमध्ये क्रिकेटरची आत्महत्या