भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबईच्या प्रादेशिक केंद्राने पुढील तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. हवामान खात्यानुसार, मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदूरबार, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ५ जुलैपर्यंत उत्तर-दक्षिण कोकण, गोवा आणि पूर्व-पश्चिम विदर्भात अति मुसळधार पाऊस होणार आहे. तर इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल तर घाटमाथावर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल.
राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळालं. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये धुवांधार झालेला पाऊस आता कमी झाला आहे. पण अशातही राज्यात जुलैचा पहिला आठवडा मुसळधार पाऊस असेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
खरंतर, राज्यात पुढील ४ ते ५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.
कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगबुडीनदी धोक्याच्या पातळी जवळ वाहत होती.
जगबुडी नदीची धोकादायक पातळी सात मीटर आहे सोमवारी सायंकाळी उशिरा ६.४० मीटर वरून या डेंजर पातळी जवळून ही नदी वाहत होती. त्यामुळे खेड नगरपरिषद प्रशासनाकडून खेड शहर परिसरातील जगबुडी नदीच्या नागरिकांना भोंगा वाजवून पहिला अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा