परिवहन मंत्रालयाने मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाने परवानगी दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे. मुंबईत वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत आहे. यावर उपाय म्हणून बाईक टॅक्सीला मंजुरी दिल्याचे म्हटले जात आहे.
येत्या काही दिवसांत मुंबईकरांना बाईक टॅक्सी सेवांचा लाभ घेता येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान परिवहन मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. बाईक टॅक्सीमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल असे म्हटले जात आहे. यामुळे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचेही अंदाज वर्तवला जात आहे.
राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांनी बाईक टॅक्सी सेवांना जोरदार विरोध केला होता. यासंदर्भात रॅपिडो कंपनीने बाईक टॅक्सी सुरु करण्यासाठी परवानगी मागितली होती. पण पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कंपनीला परवानगी दिली नव्हती.
यावरुन कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याच दरम्यान राज्य सरकारने बाइक टॅक्सी अॅग्रीगेटर्ससाठी धोरण ठरवण्यासाठी एक समिती स्थापन केली होती.
बाईक टॅक्सी नॉन-ट्रान्सपोर्ट वाहनांच्या श्रेणीत मोडतात. त्यामुळे त्यांना टॅक्सी आणि रिक्षा यांसाठी आवश्यक असलेल्या परवान्यांपासून सूट मिळते, असे म्हणत टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांना बाईक टॅक्सींना विरोध केला होता.
जून 2024 मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने बाईक टॅक्सी सेवांना मंजुरी दिली होती. एप्रिल महिन्यापासून मुंबईत बाईक टॅक्सी सेवा सुरू होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा