मुंबईत ऐतिहासिक इमारतींचा खजिना आहे. या ऐतिहासिक वारशाची माहिती देश विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी पर्यटन विभागामार्फत व्यापक प्रयत्न सुरू आहे. त्याअंतर्गत येत्या काळात 'क्यू आर कोड'च्या सहाय्याने एका क्लिकवर या सर्व हेरिटेज इमारतींची माहिती फोटोसह उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हाॅर्निमन सर्कलपर्यंत प्राचिन वारसा लाभलेल्या अनेक इमारती आहेत. मुंबईतील या ऐतिहासिक सौंदर्याशी सर्वांनी परिचित व्हावे यासाठी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन विभाग व पर्यटन विकास महामंडळामार्फत बुधवारी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रावल बोलत होते. या वॉकमध्ये रावल यांच्यासह प्रधान सचिव नितीन गद्रे, 'एमटीडीसी'चे अधिकारी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मुंबईतील जगप्रसिद्ध प्राचीन इमारतींमागचा इतिहास, या इमारती केव्हा बांधल्या, कशा परिस्थितीत बांधल्या याबाबत सर्वांना माहिती मिळावी म्हणून हेरिटेज वॉक या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या हेरिटेज वॉकचा ९ वाजेदरम्यान एशियाटीक लायब्ररी येथे समारोप करण्यात आला.
जागतिक पर्यटनदिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थ्ाळांची माहिती दर्शविणारे प्रदर्शन मंत्रालयात भरविण्यात आले आहे. व्याघ्र प्रकल्प, प्राचिन वारसा लाभलेल्या इमारती, जंगल, निसर्गरम्य ठिकाणे आदींची थ्रीडी स्वरूपातील माहिती या प्रदर्शनात आहे.
गिरगाव चौपाटी येथे बुधवारी एमटीडीसीमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी रावल यांनी उपस्थित विद्यार्थी व अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.
हेही वाचा -
पर्यटकांना मिळणार परवडणारी निवासव्यवस्था
अबब... मुंबईहून लंडन गाठायला ७२ दिवस
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)