महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास पोहोचणार आहे. या चक्रीवादळामुळं मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून माघारी फिरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणं, जिल्हाधिकाऱ्यांना जीवितहानी होणार नाही याकडं लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह यासंदर्भात चर्चा करून या चक्रीवादाळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनानं केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
निसर्ग चक्रीवादळाला सामोरं जाण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यात झालेल्या चर्चेनुसार, वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या काही तुकडयाही तयार ठेवण्यात आल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकडयांपैकी १० तुकडया तैनात करण्यात आल्या असून एसडीआरएफच्या ६ तुकडया राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - धारावीतील २०० खाटांचं 'कोविड' विशेष रुग्णालयाचे काम पूर्ण
या निसर्ग चक्रीवादळामुळं वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसंच, पालघर आणि रायगडमधील रासायनिक कारखाने, अणूऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कच्चा घरात राहत असलेल्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे.
महानगरपालिकेचा मुख्य नियंत्रण कक्ष आणि विभागवार नियंत्रण कक्ष पुरेशा मनुष्यबळासह सज्ज करण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आपल्या विभागातील संभाव्य धोके पोहोचू शकणाऱ्या वसाहती तसंच सखल भागातील वसाहती निश्चित करुन तेथील नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा -
यंदा १२ वीचा निकाल १० जूनला नाही लागणार, विद्यार्थ्यांना पहावी लागणार वाट
१२९ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे चक्रिवादळ, IMD नं केला फोटो प्रसिद्ध