Advertisement

मालमत्ता थकबाकीदारांवर आता प्रत्यक्ष कारवाई, नवी मुंबई पालिकेचा निर्णय

थकबाकीदारांविरोधात करावयाच्या पुढील कायदेशीर कार्यवाहीचा ॲक्शन प्लॅन तयार करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ताकर विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले आहेत.

मालमत्ता थकबाकीदारांवर आता प्रत्यक्ष कारवाई,  नवी मुंबई पालिकेचा निर्णय
SHARES

मोठ्या रकमेची मालमत्ता कर थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांना नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता जप्ती आणि लिलावाची नोटीस बजावून 21 दिवस झाले आहेत. या नोटिसीला प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांविरोधात प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे. थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यात येणार आहे.

थकबाकीदारांविरोधात करावयाच्या पुढील कायदेशीर कार्यवाहीचा ॲक्शन प्लॅन तयार करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ताकर विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले आहेत. 

मोठ्या रक्कमेची थकबाकी असणा-या 31 मार्च 2021 पूर्वीच्या 26 मालमत्ता कर थकबाकीदारांना 1 ते 15 जून या कालावधीत मालमत्ता जप्ती आणि लिलावाच्या नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे 16 जून ते 2 जुलै कालावधीत 49 थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्यानंतर 3 ते 15 जुलै 2021 या कालावधीत आणखी 53 थकबाकीदारांवर जप्ती आणि लिलावाची नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. 

यामध्ये बेलापूर विभागातील 3 मालमत्ता, नेरुळ विभागातील 9 मालमत्ता, वाशी विभागातील 6 मालमत्ता, तुर्भे विभागातील 9 मालमत्ता, कोपरखैरणे विभागातील 11 मालमत्ता व घणसोली विभागातील 8 मालमत्ता व ऐरोली विभागातील 7 मालमत्तांचा समावेश आहे. या 53 मालमत्ता धारकांची 75 कोटी 96 लाखाहून अधिक रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी आहे. अशाप्रकारे आत्तापर्यंत 128 मालमत्ताकर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत. त्यातील नोटीस मुदत संपलेल्या थकबाकीदारांविरोधात आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा