वरळी म्हटलं की टोलेजंग इमारती, चकाचक ऑफिसेस, हायप्रोफाईल कर्मचारी नजरेसमोर येतात. मुंबईतील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र म्हणूनही वरळीचे विशेष महत्त्व आहे. पण याच वरळीतील सिद्धार्थ नगर आणि प्रेम नगर झोपडपट्टीतील रहिवाशांना साधी शौचालयाचीही सोय उपलब्ध नाही, हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत'ची हाक दिल्यानंतर देशभरातील सरकारी प्राधिकरणे, स्वयंसेवी संस्था, सर्वसामान्यांनी स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, उघड्यावर शौच करण्यास कायद्याने प्रतिबंध करण्यात आला.
पण त्या अगोदर नागरिकांना सुविधा पुरवणे आवश्यक असताना या सुविधा पुरविण्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. वरळीतही अशीच काहीशी परिस्थिती असून रहिवासी वरळी टेकडीवर उघड्यावर शौच करताना दिसतात.
मुंबईतील लोकसंख्या प्रचंड वाढलेली असल्याने रहिवासी जेथे जागा मिळेल तिथे रहात आहेत. रस्त्याच्या कडेला, रेल्वे ट्रॅक शेजारी, अनधिकृत झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांची संख्या दिवासागणिक वाढतच आहे. वरळी नाक्यावरील वॉटर रिझर्व्ह टँकच्या बाजूला सिद्धार्थ नगर, प्रेमनगरही अशीच वसाहत असून येथे किमान 18 ते 20 हजार रहिवासी राहतात.
एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी वसाहतीत अवघी 20 शौचालयं आहेत. ती देखील पावसाळ्यात तुंबत असल्याने रहिवाशांना उघड्यावर शौचास बसावे लागते
आबाजी कांबळे, स्थानिक रहिवासी
या वसाहतीत बरीच मंडळे आहेत. ही मंडळे समाज प्रबोधनाचे काम करतात. पण मंडळांचे म्हणणे ऐकण्यासही वेळ नसलेले येथील रहिवासी बिनदिक्कतपणे उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत परिसरात साथीचे रोग पसरतात.
विनोद साळुंखे, सह-सचिव, भारत मंडळ, सिद्धार्थ नगर
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वरळीतील उच्चभ्रू परिसरात 23 वर्षीय अर्जुन मेघे हा तरुण सरसावला असून 'इन्सानियत' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अर्जुनने येथील रहिवाशांना बायो टॉयलेट देण्याचे ठरवले. 'पोर्टर पॉटी बायो टॉयलेट' असं नाव असलेल्या या बायो टॉयलेटसाठी अर्जुनने प्रशासनाकडे रीतसर परवानगी मागितली होती. मात्र पालिकेच्या पाणी व्यवस्थापन विभागातील अभियंत्यांनी सुरक्षा आणि भविष्यातील नियोजनाचा दाखला देत त्याला ही परवानगीच नाकारली.
एका बाजूला 'स्वच्छ भारत'चा ब्रँड अॅम्बेसेडर अमिताभ बच्चन नागरिकांना बंद दरवाजाआड शौचाला बसण्याचा सल्ला देतो. पण 'इन्सानियत'सारख्या स्वयंसेवी संस्था पुढाकार घेऊन सरकारला याकामी मदत करत असतानाही त्यांचे काम लालफितीत अडकवले जाते. हीच 'स्वच्छ भारत'ची खरी शोकांतिका आहे.
हे देखील वाचा -
बी पालिका विभागात 'क्लिन अप मार्शल'ची जागा घेणार स्वच्छतादूत
मोदींकडून अफरोज शाहच्या स्वच्छता मोहिमेचे कौतुक
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)