वर्षानुवर्षे रखडलेल्या नायगाव, ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला अखेर म्हाडाच्या माध्यमातून सुरुवात झाली. येत्या 7 वर्षांत बीडीडीच्या जागेवर टोलेजंग इमारती उभ्या असलेल्या पहायला मिळतील. त्यामुळे सर्वसामान्य मराठी माणूस 160 चौ. फुटांच्या घरामधून उंच टॉवरमधील 500 चौ. फुटांच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी जाईल. त्याचवेळी शिवडीतील बीडीडी चाळींतील रहिवाशांचे मात्र टॉवर, फ्लॅटमध्ये वास्तव्याचेे स्वप्न स्वप्नच राहिले आहे.
शिवडीतील बीडीडी चाळींच्या जमिनीपासून ते अनेक तांत्रिक अडचणींमुळे शिवडीला वगळून बीडीडीचा पुनर्विकास हाती घेण्यात आला आहे. मात्र आता शिवडीचा हा पुनर्विकास होण्याची शक्यता दाट झाली आहे. नुकतेच गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शिवडीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत शिवडीचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठीच्या प्रक्रियेला वेग देण्याचे आदेश म्हाडाला दिले आहेत. तर शिवडीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी व्यवहार्यता अभ्यास करत यासंबंधीचा अहवाल लवकरात लवकर सरकारकडे सादर करण्याचे आदेश म्हाडाला दिले आहेत.
शिवडीतील सुमारे 5.72 एकर जागेवर बीडीडी चाळींच्या 12 इमारती वसल्या आहेत. या चाळी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असून येथे अंदाजे 960 रहिवासी राहतात. या चाळी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात असल्याने या चाळींचा विकास म्हाडाला हाती घेता येत नाही. कारण यासाठी केंद्राची परवानगीसह संबंधित यंत्रणांचीही परवानगी घ्यावी लागणार असून ही प्रक्रिया अत्यंत मोठी आणि किचकट आहे. या अडचणींसह अन्यही अडचणी येथे आहेत.
ही जागा 99 वर्षाच्या लीजवर देण्यात आली असून हे लीज 2022 मध्ये संपणार आहे. त्यामुळे नवीन लीज करून घ्यावे लागणार आहे. 1991 च्या लेआऊटनुसार खेळाचे मैदान, शाळा इत्यांदीचा यात समावेश आहे. सीआरझेडमध्ये ही जागा येते. त्यामुळे या जागेवर 150 मीटर उंचीच्या म्हणजेच 50 मजली इमारती बांधता येतात. या सर्व बाबींचा विचार करता या चाळी पुनर्विकासासाठी हाती घेणे अवघड असल्याचे या बैठकीत अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
हा पुनर्विकास कसा मार्गी लावता येईल, यासाठीचा व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी म्हाडाकडून एका सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याची महिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांननी यावेळी दिली. त्यानुसार या कंपनीकडून शक्य तितक्या लवकर व्यवहार्यता अभ्यासपूर्ण करून घेत त्यासंबंधीचा अहवाल सरकारकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शिवडीतील बीडीडीचा पूनर्विकास मार्गी लागण्याची आशा पल्लवित झाली आहे. शिवडीतील बीडीडीवासियांसाठी ही आनंदाचीच बाब म्हणावी लागेल.
हेही वाचा -
बीडीडीकरांनी पुन्हा केला बायोमेट्रीकचा विरोध
बीडीडीवासीयांना हवंय 685 चौ. फुटांचं घर
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)