मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या माहीम-मरोळ मरोशी जलबोगद्याच्या दुरुस्तीचं काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत आहे. यासाठी माहीम भूमिगत जलबोगद्याजवळ १२०० मि.मी व्यासाच्या झडपेच्या दुरुस्तीचं काम गुरुवारी १८ जानेवारी रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत शहर भागासह वांद्रे ते सांताक्रूझ पश्चिम भागातील पाण्याचा पुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार आहे.
भूमिगत जलबोगद्याचं हे काम १८ जानेवारीला सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हे दुरुस्तीचं काम करण्यासाठी मरोळ-मरोशीपासून ते माहीम रुपारेल कॉलेज ते रेसकोर्सपर्यंतचा जलबोगदा १२ तासांकरता बंद करावा लागणार असल्यामुळे या कालावधीत पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
त्यामुळे शहर भागातील कुलाबा, नरिमन पॉईंट ते भायखळा आणि प्रभादेवी, दादर ते धारावी आदी भागांमध्ये आणि पश्चिम उपनगरातील वांद्रे ते सांताक्रूझ पश्चिम भागामध्ये पाणी पाण्याचा पुरवठा बंद राहणार आहे.