मुंबईसह आसपासच्या परिसरातील तापमानात वाढ होत असून उकाडा जाणवू लागला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत ३७.१ अंश एवढे तापमानाची नोंद करण्यात आली. तापमान वाढल्यानं मुंबईकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागानी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी कुलाबा येथे ३३ व सांताक्रूझ येथे ३७.१ अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे. ३ मार्च हा उष्ण दिवस ठरला आहे. आतापर्यंत मार्चमधील नोंदी पाहिल्या तर या काळात तापमानात वाढ नोंदविण्यात येते. जेव्हा एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होतो तेव्हा तापमानात असे बदल होत असतात.
अरबी समुद्राहून मुंबईकडे वाहणारे वारे सकाळी स्थिर झाल्यास ते तापत नाहीत. हेच वारे स्थिर होण्यास दुपार झाली तर ते तापतात. दरम्यान, थंडीनं मुंबईतून सध्या काढता पाय घेतल्याचं दिसतं. त्यामुळं मुंबईत येत्या काळात आणखी तापमान वाढण्याची शक्याता आहे. ५ ते ८ मार्च दरम्यान महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका अधिक जाणवेल. ९ व १० मार्च दोन दिवस काहीसा दिलासा मिळून शुक्रवार, ११ मार्चपासून पुन्हा तापमान वाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.