गेल्या अनेक दिवसांपासून सतत वाढणाऱ्या उकाड्यामुळं मुंबईकर प्रचंड हैराण झाले आहेत. तसंत, मुंबईसह राज्यभरात प्रचंड उकाडा वाढला आहे. परंतु, उकाडा वाढला असला तरी, काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, असं असलं तरी येत्या ५ दिवसांत राज्यात काही ठिकाणी उष्ण लहरींचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे.
मुंबईचे कमाल तापमान शनिवारी ३५.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलं असून, आर्द्रता ६३ टक्के नोंदविण्यात आली होती. आर्द्रतेमधील चढउतारामुळं मुंबईकर हैराण होतं आहे. शनिवारी ढगाळ वातावरणानं यात आणखी भर घातल्याचं चित्र होतं. रविवारसह मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ स्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती सोमवारी देखील तशीच राहणार आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५ आणि २८ अंशाच्या आसपास राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.
त्याशिवाय मुंबई-पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा बरेच वर गेल आहे. मात्र, सध्या काही ठिकाणी ढगाळ स्थिती निर्माण होत आहे. पुढील २ दिवसांमध्ये विदर्भ, कोकण विभागासह काही ठिकाणी वादळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ आदी काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याशिवाय, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ स्थिती निर्माण होणार असून, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा -
'गांधीजींबद्दल ट्विट केल्याबद्दल निधी चौधरींवर कारवाई करा’, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
रेल्वेप्रमाणं आता एसटीचा प्रवास होणार कॅशलेश