मुंबई-अहमदाबाद मार्गावरील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गायमुख ते वसईपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. शक्य असल्यास या मार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसामुळे अनेक मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. मुंबई अहमदाबाद रोडवर कंबरे इतके पाणी साचले आहे. त्यामुळे या रस्त्यावर अनेक वाहने अडकली आहेत. साचलेल्या पाण्यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. वसईतील गायमुख ते बापाणे पोलिस चौकीपर्यंत घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे या मार्गावर शक्यतो वाहतूक टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साचल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील महाड परिसरातील विसावा नदीजवळ नव्याने बांधलेल्या रस्त्याचा मोठा भाग खचला आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांनी कोसळल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तसेच ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हेही वाचा