दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने (thane municipal corporation) कृती आराखडा तयार केला आहे. त्याआधारे सिग्नलच्या प्रतिक्षेत असलेल्या वाहनचालकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी पालिकेने जाळीचे आच्छादन टाकले आहे.
त्यापाठोपाठ आता शहरातील 25 गर्दीच्या ठिकाणी पालिका प्रशासनाने विविध स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने पाणपोई (water hole) सुरू केल्या आहेत. ठाणे स्थानकातील सॅटीसच्या खाली असलेल्या पाणपोईच्या उद्घाटनाने या उपक्रमाची मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ होते तर, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. या वातारणीय बदलांमुळे ओढावलेल्या परिणामांना तोंड देण्यासाठी सुसज्ज राहणे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पालिकेकडून करण्यात येत आहे.
नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरील नियंत्रणासाठी गेल्यावर्षी ठाण्याचा सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (mahrashtra) शासन, ठाणे (thane) महानगरपालिका व काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायरोमेंट अॅण्ड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केलेला आहे. त्यानुसार, उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे.