महाराष्ट्र (maharashtra) सरकार (government) आगामी नियोजित शहर तिसऱ्या मुंबईसाठी (Third Mumbai) 2025 मध्ये सर्वेक्षण करण्याची योजना आखत आहे. कर्नाळा-साई-चिरनेर (karmala-sai-Chirner) न्यू टाऊन म्हणजेच केएससी (KSC) न्यू टाऊन या नावाने ओळखले जाणार आहे.
तसेच हे क्षेत्र भविष्यात भारतातील 65% डेटा सेंटर्सचे केंद्रस्थान असेल अशी अपेक्षा आहे. या परिसरात भू-संशोधन आणि हवाई सर्वेक्षण करण्यासाठी खासगी कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
सर्वेक्षण केले जाणारे एकूण क्षेत्रफळ 323.44 चौरस किलोमीटरवर पसरले आहे. या जमिनीत जवळपास निम्मे टेकड्या, जंगले आणि शेतजमीन आहेत. सर्वेक्षणाची सुरुवात ड्रोनद्वारे केली जाईल.
तसेच त्यानंतर लिडार तंत्रज्ञान आणि इतर पद्धती वापरून तपशीलवार विश्लेषण केले जाईल. आणखी एक खाजगी कंपनी या नवीन शहरासाठी व्हिजन रिपोर्ट, मास्टर प्लॅन आणि विकास धोरण तयार करणार आहे.
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (MMRDA) हवाई सर्वेक्षण, जमिनीवरील डेटा मिळवणे आणि जमिनीच्या मालकीची माहिती गोळा करण्यासाठी सल्लागार नियुक्त करेल. या प्रक्रियेत भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) तंत्रज्ञानावर आधारित नकाशे तयार केले जातील.
सर्वेक्षण आणि प्राथमिक संशोधनाला सहा ते आठ महिने लागतील. मास्टर प्लॅन ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या नवीन शहराचे उद्दिष्ट कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी करणे आहे.
हा प्रकल्प भारताच्या विकासासाठी NITI आयोगाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. 2029 पर्यंत मुंबई (mumbai) महानगर क्षेत्राचा जीडीपी 300 अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या उद्दिष्टाचाच हा एक भाग आहे.
सप्टेंबरमध्ये, जागतिक आर्थिक मंच आणि MMRDA यांनी प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.