Advertisement

पालिका अधिकारी म्हणतायत, 'सांगा आमचं चुकलं काय?'


पालिका अधिकारी म्हणतायत, 'सांगा आमचं चुकलं काय?'
SHARES

रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरोथॉन स्पर्धेसाठी महापालिकेने याआधीच परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देण्यावरून दोन अतिरिक्त आयुक्तांमध्ये चांगलेच मानापमान नाट्य रंगले आहे. या स्पर्धेसाठी शहर विभागाचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी परवानगी दिली. परंतु, 'रस्ते व कचरा हे आपल्याकडे असल्याने यासाठी आपली परवानगी घ्यायला पाहिजे', असा दमच अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिला. त्यामुळे 'नियमानुसार काम करूनही आपले चुकले कुठे?' असा प्रश्न पालिकेतील कनिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे.


'प्रोकॅम'ला पाठवली होती नोटीस

रविवारी २१ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यापूर्वी महापालिकेने स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या 'प्रोकॅम' कंपनीला नोटीस पाठवून 'आधी थकीत रक्कम भरा, त्यानंतरच परवानगी दिली जाईल', असा इशारा दिला होता. या नोटीस विरोधात कंपनी न्यायालयातही गेली होती. परंतु, न्यायालयाने काही ठोस रक्कम भरण्याचे आदेश दिल्यानंतर 'प्रोकॅम'ने १ कोटी रुपये अनामत रक्कम म्हणून भरली.


'त्यांची परवानगी घेतलीच कशी?'

अनमत रक्कम भरल्यानंतर मॅरोथॉनला महापालिकेने परवानगी देण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेचे आयोजन शहर भागात असल्याने शहराचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्या स्वाक्षरीने परवानगी देण्यात आली. परंतु, ही बाब जेव्हा अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे विचारणा केली. तेव्हा या अधिकाऱ्यांनी नियमानुसार परवानगीसाठी अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्याकडे पाठवली होती आणि त्यांनी परवानगी दिल्याचे सांगितले. यावर सिंघल हे अधिकाऱ्यांवर खवळले.


'सांगा आमचं चुकलं काय?'

स्पर्धेसाठी लागणारे रस्ते आणि घनकचरा व्यवस्थापन खाते माझ्याकडे आहे. मग यासाठी माझीच परवानगी लागेल. तुम्ही त्यांची सही घेतलीच कशी? अशी विचारणा करून सिंघल यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नियमानुसार काम करूनही जर वरिष्ठांचे दोन शब्द ऐकून घ्यायला लागत असतील, तर काम कसे करायचे? अशा पेचात हे अधिकारी पडले आहेत.



हेही वाचा

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, मॅरेथॉनसाठी विशेष सेवा

मॅरेथॉनमध्ये सहभागी होताय? मग हे वाचाच!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा