वाशीमधील एपीएमीस मार्केट पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली बुधवारी भाजीपाला आणि कांदा-बटाटा बाजार सुरू करण्यात आले. बाजारातील गर्दी आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आता दोन ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. यामुळे बाजारात कुठे काय सुरू आहे, हे कळेल. तसेच जिथे गर्दी होईल त्या ठिकाणी पोलिसांना लगेच पोहोचता येणार आहे. बाजारात सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करूनही गर्दी पूर्णपणे नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्यांनी बाजारावर लक्ष ठेवलं जाणार आहे.
कोरोना रुग्ण आढळल्याने एपीएमसीमधील भाजीपाला आणि कांदा-बटाटा मार्केट ११ एप्रिलपासून बंद होते. त्यामुळे भाजीपाल्याचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत होता. त्यामुळे बुधवारी बाजार नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरू करण्यात आले. मात्र, बाजारात गर्दी मात्र नव्हती. बुधवारी घाऊक भाजीपाला बाजारात १३ ट्रक आणि १८० टेम्पो अशा १९३ गाड्यांची आवक झाली. तर ४९१ थ्री व्हीलर टेम्पो भाजीपाला बाजाराबाहेर गेला. वेगवगेळ्या चेकनाक्यांवरून ३९८ गाड्या भाजीपाला मुंबईत रवाना झाला आहे.
बाजारात मालाच्या गाड्या आणण्यावर निर्बंध घातल्याने व्यापाऱ्यांनी मोजक्याच गाड्या मागवल्या होत्या. त्यामुळे बाजारात शिस्तीत व्यापार सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. कांदा-बटाटा बाजारातही एकूण १५० गाड्या आल्याची नोंद आहे, तर ६७ गाड्या माल बाजाराबाहेर गेला आहे.
हेही वाचा -