बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कोल्हापूर येथून वाघाटीची तीन पिल्ले आणण्यात आली आहेत. त्यामुळे उद्यानातील वाघाटींची एकूण संख्या आता 11 झाली आहे.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील एका गावात ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांना शेतात वाघाटीची तीन पिल्ले आढळली होती. प्रथमदर्शनी ती मांजरीची पिल्ले असल्याचे समजून ऊसतोड कामगारांनी त्या पिल्लांना घरी नेले.
वनविभागाच्या लक्षात येताच वनविभागाने वाघाटीची पिल्ले ताब्यात घेऊन ती जेथे सापडली होती तेथे ठेवली. पिल्लांची आणि आईची भेट होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांची आई तेथे न आल्याने अखेरीस ती पिल्ले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे सुपूर्द करण्यात आली.
वाघाटी हा मांजर कुळातील प्राणी आहे. बिबटय़ाच्या हुबेहूब लहान प्रतिकृतीसारखी वाघाटी दिसते. त्यांचा रंग आणि अंगावरील ठिपके हे बिबटय़ाप्रमाणेच असतात.
दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वाघाटी प्रजनन प्रकल्प’ राबविला जात आहे. राष्ट्रीय उद्यानात दुर्मीळ होत चाललेल्या वाघाटीच्या वाढीसाठी 2013 पासून हा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पात वाघाटीच्या पिंजराबंद प्रजननाचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारचे पिंजरे तयार करण्यात आले आहेत.
सध्या उद्यानात आणण्यात आलेल्या वाघाटीच्या पिल्लांसह पूर्वीची वाघाटीची 1 जोडी तसेच पुणे येथून काही वर्षांपूर्वी आणण्यात आलेली अशी उद्यानातील वाघाटींची संख्या एकूण 11 झाली आहे.
हेही वाचा