दादरच्या शिवसेना भवनसमोर शुक्रवारी रात्री मोठी जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाहून गेलं. मेट्रोच्या कामादरम्यान ही जलवाहिनी फुटल्याने मेट्रोच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. ही जलवाहिनी दुरुस्त करण्यास शनिवार दुपार उजाडणार असल्याने दादरकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो.
गोखले रोडच्या उत्तरेला शिवसेना भवनजवळ शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास जलवाहिनी फुटली. या ठिकाणी मेट्रो रेल्वेचं काम सुरू असून या कामादरम्यान ही जलवाहीनी फुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच येथील मुख्य व्हॉल्व बंद करून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. पण तोपर्यंतच हजारो लिटर पाणी वाहून वाया गेलं होतं.
जल खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही जलवाहिनी मेट्रोच्या कामामुळे फुटली आहे. या भागात रात्री 9 पर्यंत पाणीपुरवठा होत असल्याने 9 नंतर पाणीपुरवठा बंद करण्यात आला. या जलवाहिनीची दुरुस्ती शनिवारी सकाळी हाती घेऊन संध्याकाळी या भागात पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल. तसंच या दुरुतीचा खर्च मेट्रो कंपनीकडून वसूल केला जाईल, असं जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांनी स्पष्ट केलं.