न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांचा मृत्यू नेमका कसा झाला? आणि कुणी केला? यावरून देशभरात मोठा वाद सूरू आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. पण अजूनही न्या. लोया यांना न्याय मिळत नसल्याचं म्हणत मंगळवारी बोरीवली ते दादर रेल्वे स्थानकादरम्यान ८ जणांनी एकत्र येऊन अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. एवढंच नव्हे, या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्यांनी उचलून धरली.
न्या. लोया यांचा २०१४ मध्ये नागपुरात संशायस्पद मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं म्हटलं असलं, तरी त्यांच्या मृत्यूवरील संशयाचे मळभ अद्यापही दूर झालेले नाही. गुजरातमधील सोहराबुद्दीन खून खटल्याच्या सुनावणीसाठी न्या. लोया नियुक्ती करण्यात आली होती. त्यातच त्यांचा अचानक मृत्यू झाला.
हा मृत्यू नैसर्गिक नसून संशयास्पद असल्याचं म्हणत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या ४ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी घेतली असून ही सुनावणी पूर्ण झाली आहे. आता यावरील अंतिम निर्णयाची प्रतिक्षा आहे.
लोयांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा केला जात असला तरी मृत्यू संशास्पद असल्याचं म्हणत या प्रकरणाच्या उच्च स्तरीय चौकशीची मागणी समाजातील विविध घटकांकडून करण्यात येत आहे. यात मुंबईतील ८ जणांच्या एका ग्रुपचाही समावेश आहे. या ग्रुपकडून याप्रकरणी पाठपुरावा केला जात असून फेसबुकवरही या मित्रांनी या प्रकरणी जनजागृती मोहीम राबवत Who Killed Justice Loya? असा सवाल केला आहे.
मंगळवारी बोरीवली ते दादर असा लोकल प्रवास करत लोकलमध्ये आणि रेल्वे स्थानकावर या ८ जणांनी निषेध नोंदवला. निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी Who Killed Judge Loya? असं लिहिलेलं टी शर्ट घातले होते. जोपर्यंत न्या. लोयाचा मृत्यू कसा झाला आणि त्यांना कुणी मारलं? या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत या प्रकरणी आम्ही पाठपुरावा सुरूच ठेवणार, अशी प्रतिक्रिया या ग्रुपमध्ये सहभागी तरूण विनोद चांद याने नोंदवली.
हेही वाचा-
मरिन ड्राइव्ह हिट अॅण्ड रनमध्ये इंटर्न डाॅक्टरचा मृत्यू