मुंबई महापालिकेच्या अथक प्रयत्नांमुळे कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या धारावीतील कोरोना नियंत्रणात आला आहे. पालिकेने राबवलेल्या कोरोनामुक्तीच्या धारावी पॅटर्नची दखल आता जागतिक बँकेने घेतली आहे. पालिकेने चिकाटीने कोरोना रोखण्यासाठी केलेले प्रयत्न हे धारावी पॅटर्नचं यश असल्याचं कौतुक जागतिक बँकेने केलं आहे.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत सुरूवातीला कोरोनाचा फैलाव वेगाने झाला होता. त्यानंतर डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आला. त्यामुळे धारावी कोरोनाशी लढा देणाऱ्या जगभरातील देशांसाठी एक आदर्श बनला आहे.
धारावीत लोकसहभाग, स्थानिक स्तरावरील उपाययोजना यांचा उपयोग करुन प्रभावीपणे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखल्याचं मत जागतिक बँकेने व्यक्त केलं आहे. जागतिक बँकेच्या एका अहवालात मुंबईतील कोरोना नियंत्रणाची विशेष दखल घेण्यात आली आहे.
जागतिक बँकेने आपल्या 'गरीबी आणि सामायिक समृद्धी' या द्वैवार्षिक अहवालात म्हटलं की, मे महिन्यात संक्रमणाची प्रकरणे सर्वाधिक होती, मात्र योग्य पाऊले उचलल्यामुळे तीन महिन्यांनंतर जुलैमध्ये कोरोनाचा प्रसार २० टक्के कमी झाला.
मुंबईतील अधिकाऱ्यांनी धारावीतील ताप आणि ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या रूग्णांची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यासाठी प्रयत्न केले. या मोहिमेमध्ये लोकांना सामील केले. एवढेच नव्हे तर खासगी रुग्णालयांचे कर्मचारीदेखील तैनात केले होते, ज्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला गेला.
धारावी पॅटर्नचं यापूर्वी जागतिक आरोग्य संघटना, वॉशिंग्टन पोस्टने कौतुक केले होतं. धारावीत यशस्वी ठरलेली संसर्गाचा पाठलाग ही मोहीम सध्या फिलिपिन्स सरकार तेथील झोपडपट्ट्यांमध्ये राबवित आहे. महिनाभरापासून मुंबईत पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र धारावीत रुग्णसंख्या अद्याप नियंत्रणात आहे. याबाबत जागतिक बँकेने पालिकेच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.
हेही वाचा -
प्रवाशांसाठी गुड न्यूज! ९ आॅक्टोबरपासून धावणार ‘या’ ५ विशेष एक्स्प्रेस
मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता