Advertisement

मुंबईकर व पर्यटकांसाठी वरळी ते प्रभादेवी समुद्री पायवाट

गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई महापालिकेनं मुंबईतील बऱ्याच ठिकाणांच्या सुशोभीकरणाचा वसा हती घेतलाय.

मुंबईकर व पर्यटकांसाठी वरळी ते प्रभादेवी समुद्री पायवाट
SHARES

मुंबईकरांना नवनवीन सुविधा देण्यासाठी व उपक्रम सुरू करण्यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई महापालिकेनं मुंबईतील बऱ्याच ठिकाणांच्या सुशोभीकरणाचा वसा हती घेतलाय. त्याचाच एक भाग म्हणून आता मुंबईकर व पर्यटकांना समुद्री पदपथावरून प्रवास करता येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागानं वरळी आणि प्रभादेवी यांना जोडणारा समुद्री पदपथ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. वरळी कोळीवाड्याला लागून असलेल्या नरिमन भाट जेट्टीचा आणि प्रभादेवीतील पी. बाळू समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले असून त्याअंतर्गत ही पायवाट तयार केली जाणार आहे.

यामुळं मुंबईकरांना व पर्यटकांना समुद्री पायवाटेवरून वरळी येथून प्रभादेवीला चालत जाता येणार आहे. वरळी कोळीवाड्याला लागूनच असलेले नरिमन भाट नगर येथून वरळी व प्रभादेवी या दोन महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा समुद्र किनारा आहे. 

सध्या पालिकेच्या जी दक्षिण विभागाने नरिमन भाट जेट्टी परिसराचे व प्रभादेवीतील पी. बाळू समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले आहे.

याअंतर्गत महापालिकेने आता ही दोन्ही ठिकाणे जोडणारी एक समुद्री पायवाट तयार करण्याचे ठरवले आहे. त्याकरिता पालिका ७३ लाख रुपये खर्च करणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

नरिमन भाट जेट्टी ते पी. बाळू समुद्रकिनारा यांना जोडणारी पायवाट अस्तित्वात असून या पायवाटेची दुरवस्था झाली आहे. नरिमन भाट जेट्टी परिसरात समुद्रात वाहून येणाऱ्या कचऱ्यामुळे व पाण्याच्या माऱ्यामुळे या पदपथाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या पदपथाची सुधारणा केल्यास सामान्य नागरिकांना व पर्यटकांना वांद्रे वरळी सी लिकचे मोहक दृष्य पाहता येणार आहे.

महापालिकेने याकरिता निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार निश्चित केला असून समितीच्या पुढील बैठकीत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा