आपल्या कुटुंबासह रणथंभौरला फिरायला गेलेले माजी क्रिकेटर मोहम्मद अझहरूद्दीन यांच्या कारचा बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात रस्त्या शेजारी थांबलेला एक तरुण जखमी झाला आहे.
या अपघातात अझहरूद्दीन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य थोडक्यात बचावले आहेत. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चुराडा झाला.
अझहरूद्दीन आपल्या कुटुंबासह सवाईमाधोपूरला आले आहेत. इथल्या फूल मोहम्मद चौकात चालकाचं कारवरून नियंत्रण सुटल्यामुळे कार पलटली. अपघातात रस्त्याच्या शेजारी थांबलेला एक तरुण जखमी झाला आहे.
सूचना मिळताच, डीएसपी नारायण तिवारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला रुग्णालयात नेले. तसेच, अझहरूद्दीन आणि त्यांच्या कुटुंबाला जवळच्या एका हॉटेलमध्ये नेण्यात आलं आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (एचसीए) अध्यक्ष आहेत. अझरनं भारताकडून ९९ कसोटी आणि ३३४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यानं ४५.०३ च्या सरासरीनं ६ हजार २१५ धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात त्यानं ३६.९२ च्या सरासरीनं ९ हजार ३७८ धावा केल्या आहेत.