भारताची सलामीवीर स्मृती मंधानानं एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. स्मृती मंधाना गुलाबी चेंडूनं खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या विक्रमासह मंधानानं ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला आहे. स्मृती मंधानानं या सामन्यात आपलं पहिलंच कसोटी शतक झळकावलं असून त्यामुळे ती पिंक बॉल टेस्टमध्ये शतक झळकावणारी पहिली महिला भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्मृतीनं १७१ चेंडूंमध्ये आपलं शतक साजरं केलं.
भारत आणि ऑस्ट्रोलिया महिला क्रिकेट संघांमध्ये क्वीन्सलँड सुरू असलेल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटूंनी यशस्वी खेळीच्या जोरावर यजमानांविरुद्ध आघाडी घेतली आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी आघाडी घेतली आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला तेव्हा स्मृती शतकाच्या जवळ पोहोचली होती. मात्र, शतक साजरं करण्यासाठी तिला एक दिवसाची वाट पाहावी लागली.
तब्बल १५ वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये पुन्हा एकदा टेस्ट मॅछ होत असताना स्मृतीनं आपल्या खेळीनं त्यात वेगळीच रंगत आणली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी देखील भारतानं दमदार सुरूवात केली असून शतकवीर स्मृती मंधाना अजूनही खेळत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारतानं १ बाद १९१ धावांपर्यंत मजल मारली आहे.
'गेल्या तीन महिन्यांपासून मी एक गुलाबी चेंडू माझ्या किटबॅगमध्ये ठेवला आहे. मी त्याच्याकडे अधूनमधून पाहात असे, त्यामुळे मला त्याची सवय झाली. आम्हाला पहिल्या दिवशी फक्त २ सत्रांचा खेळ मिळाला. मी इंग्लंडमध्ये खेळून आले होते. त्यामुळं मला गुलाबी चेंडूनं खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. पण तिथे असताना मी फक्त एक गुलाबी कुकाबुरा चेंडू माझ्या खोलीत ठेवला होता. कारण मला माहिती होतं की पिंक बॉल टेस्ट होईल', असं मंधानानं म्हटलं.