मुंबईतील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी झटणारे सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश नांगरे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने गुरूवारी निधन झालं. रमेश नांगरे यांनी कोरोना काळात धारावीत झोकून देऊन काम केलं होतं. धारावी पोलीस ठाण्यात त्यावेळी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते.
दोनच दिवसांपूर्वी रमेश नांगरे यांनी कोरोनावरील लस घेतली होती. गुरुवारी रात्री ते नाईट ड्युटी करून घरी परतले होते. सकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल मुंबई पोलीस दलातून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत विविध पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावल्यानंतर काही महिन्यापूर्वीच त्यांनी साकीनाका विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना नियंत्रणात आणणं हे पालिका, पोलीस दल आणि सरकार यांच्यापुढं मोेठं आव्हान होतं. मात्र, या सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि नियोजनबद्धपणे काम केलं. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट ही त्रिसूत्री अवलंबत मिशन धारावी राबवण्यात आलं. पालिका प्रशासन व आरोग्य विभागाला पोलिसांची मोठी साथ लाभली.
रमेश नांगरे यांनी स्वत: फिल्डवर उतरत आपल्या सहकाऱ्यांना बळ दिलं. तसंच धारावीकरांमध्ये जनजागृती करण्याचं मोठं कामही त्यांनी केलं. लॉकडाऊन, संचारबंदी याबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन होण्यासाठी नांगरे यांनी संपूर्ण परिसरावर करडी नजर ठेवली. झोपडपट्टीत अगदी गल्लीबोळात फिरून त्यांनी शिस्तीचा बडगा उगारला.
धारावी पॅटर्नचं कौतुक जगभरात करण्यात आलं आहे. त्यात रमेश नांगरे यांचंही मोठं योगदान होतं. कोरोना काळात त्यांनी निभावलेल्या कामगिरीबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रमेश नांगरे यांचा कोरोना काळात धारावीमध्ये केलेल्या कामाबद्दल सत्कार केला होता.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नांगरेवा़डी (खानापूर) हे रमेश नांगरे यांचं मूळ गाव. त्यांंच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.