रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी ट्रेनमध्ये एक विकृत तरुणीसमोर अश्लील चाळे करत होता. तर चर्चगेट स्थानकावर एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. लोकल ट्रेनमध्ये एका महिलेचा आक्षेपार्ह फोटो काढून त्याला अश्लील पद्धतीने वॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट करणाऱ्या एका माथेफिरू बँक मॅनेजरला बोरीवली जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे.
बोरिवली जीआरपी पोलिस निरीक्षक राम अभंगराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित महिला ही एक वकील असून ती हायकोर्टात प्रॅक्टिस करते.
सदर महिला वकील मालाडमधील राहणारी असून शनिवारी रात्री 9.30 वाजता चर्चगेटहून बोरिवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये बसली होती. त्यावेळी तिच्या समोरच्या सीटवर एक पुरुष देखील बसला होता. वांद्रे स्थानक येताच त्या डब्यात आणखी तीन व्यक्ती चढल्या. ज्यामध्ये एका महिलेचा समावेश होता.
काही वेळानंतर समोर बसलेली व्यक्ती मोबाईलवर आपला फोटो काढत असल्याचा संशय सदर महिला वकिलाला आला. त्यानंतर तिने त्याच्याजवळील मोबाईल हिसकाऊन घेतला. तिच्यासोबत असलेल्या इतर प्रवाशांनी त्याचा मोबाईल तपासल्यानंतर त्या महिलांचेही फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आले. त्यानंतर महिला वकिलाने रेल्वेच्या 182 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करुन त्याला मलाड रेल्वे स्टेशनवर उतरवत रेल्वे पोलिसांच्या हवाली केले.
आरपीएफने त्याला बोरिवली जीआरपीच्या हवाली केले असता पोलिस तपासातून मात्र एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे हा आरोपी बँक मॅनेजर असून यापूर्वीही त्याने अशा प्रकारे कितीतरी महिलांचे फोटो काढले आहेत. जे त्याने अश्लील पद्धतीने आपल्या पर्सनल वॉट्सअॅप ग्रुपवर अपलोड केले आहेत. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. मात्र सदर आरोपीला बोरिवली कोर्टात हजर केले असता त्याला कोर्टात जामीन देखील मिळाला.
या घटनेनंतर महिलांनी महिलांच्याच डब्यातून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा -
पवईत विद्यार्थिनीला पाहून अश्लील चाळे
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)