कोरोनाचा (coronavirus) संसर्ग वाढू नये म्हणून महाराष्ट्रात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. संचारबंदीच्या काळात लोकांनी घरातच राहावं, घराबाहेर पडू नये, यासाठी जागोजागी पोलिसांचा (maharashtra police) कडक पहारा आहे. तरीही काही ठिकाणी लोकं घराबाहेर पडत असल्याने त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये चकमकी उडत आहेत. यातूनच लाॅकडाऊनच्या काळात आतापर्यंत पोलिसांवरील हल्ल्याच्या 218 घटना घडल्या असून यात 770 आरोपींना अटक केल्याची माहिती राज्याच्या पोलीस विभागाने दिली आहे. गुरूवारीच मुंबईच्या अँन्टाँप हिल परिसरात तीन पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्यात पोलिस गंभीर जखमी झाल्याचे कळते. संबधित आरोपींवर पोलिसांनी कडक कारवाई करत गुन्हा नोंदवला असल्याचे सांगितले जाते.
कोटींची दंडवसुली
पोलीस विभागाच्या माहितीनुसार, लाॅकडाऊनच्या (lockdown) काळात राज्यात कलम 188 नुसार 1 लाख 6 गुन्हे दाखल करण्यात आले असून 20 हजार 195 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. संचारबंदी असूनही रस्त्यावर वाहने काढल्याबद्दल 1296 हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तर परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या 15 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 4 कोटी 9 लाख 69 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी-कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने 112 पोलीस अधिकारी, 949 पोलीस कर्मचारी असे एकूण 1061 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
गृहमंत्र्यांचं आवाहन
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. या काळात सर्व नियमांचं पालन करणं म्हणजे स्वत:च्या आणि सामाजिक हिताचं संरक्षण होय, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांनी केलं. सरकारने लावलेले निर्बंध वैयक्तिक तसंच सामाजिक हितासाठीच करण्यात आलेले आहेत. मात्र वारंवार सांगून, विनंती करुनही काही लोकं नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकं विनाकारण लॉकडाऊन दरम्यान बाहेर पडतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. याची जाणीव संबंधित लोकांनी ठेवावी. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
लॉक डाऊन पाळणं हे आपल्या सार्वजनिक हिताचं आहे. पोलीससुद्धा माणूस आहे. स्वत:च्या सुरक्षेचं विचार न करता पोलीस कर्मचारी तासनतास अत्यंत विषम व प्रसंगी धोकादायक परिस्थिती मध्ये काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेली निर्देश मानावेत. पोलीस, आरोग्य कर्मचारी व प्रशासनाला घरी राहूनच सहकार्य करावं, असं आवाहन देशमुख यांनी केलं.