फेसबुकवरील मैत्री भांडुपमधील ५१ वर्षीय महिलेला चांगलीच महागात पडली. अनोळखी दोन ठगांनी महिलेचा विश्वास संपादन करून भेट वस्तू पाठवण्याच्या बहाण्याने तिला तब्बल साडेचार लाखांना चुना लावल्याचं उघडकीस आलं अाहे. या प्रकरणी महिलेने भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीत ही महिला आपल्या कुटुंबियांसोबत राहते. जुलै महिन्यात तिची आँक्सर रोनाल्ड या व्यक्तीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर दोघांमध्ये मेसेंजरवर बोलणं सुरू झालं. महिनाभरातच आॅक्सरने महिलेचा विश्वास जिंकला. आपण कॅनेडियन नागरिक असल्याचं त्याने महिलेला सांगितलं होतं. मी पहिल्यांदाच भारतीय अनोळखी व्यक्तीशी इतका बोलत असून त्याने महिलेला तिचा स्वभाव अावडल्याचं सांगितलं. त्यामुळेच आपण एक महागडे गिफ्ट पाठवत असल्याचं त्याने महिलेला सांगितलं.
त्यानंतर दोन दिवसांनी तिला जेठीया मिश्रा या नावाच्या व्यक्तीने फोन करून अापण एअरपोर्टवरील कस्टम कार्यालयातून बोलत असल्याचं सांगितलं. कॅनडाहून आलेलं तुमचं पार्सल महागडं असून त्यासाठी जादा कर भरावा लागेल. अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असं त्याने सांगितलं. पैसे भरण्यासाठी तुम्ही न येता खात्यावरही भरू शकता असंही सुचवलं. घाबरलेल्या महिलेने पैसे भरण्याची तयारी दर्शवली. जेठीया यांनी दिलेल्या खाते क्रमांकावर सुरूवातीला २५ हजार रुपये क्लिअरन्सच्या नावाने भरले. त्यानंतर टप्याटप्प्याने तिला ४ लाख ४० हजार रुपये भरण्यास भाग पाडले.
मात्र, फोनवरून पैशांची मागणी थांबतच नसल्याने महिलेला संशय आला. त्यानंतर तिने अाॅक्सरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन नाॅट रिचेबल येत होता. त्यानंतर महिलेने पुन्हा जेठीया नावाच्या व्यक्तीने केलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला असता त्याचाही फोन नाॅट रिचेबल येत होता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेने भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून अशा भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
हेही वाचा -
गुंतवणूकदारांना गंडवणारा गजाआड
विश्वासू नोकरानेच तीन कोटीचे दागिने लांबवले