मुंबईतील नामांकीत व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी कुख्यात गुंड गुरू साटमच्या पाच हस्तकांना नुकतीच अटक केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी आता पाचही आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. ७९० पानी दोषारोप पत्रात ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तक्रारदार व्यावसायिकाकडून गुरू साठमचे नाव सांगून शंकर विचारे, भरत प्रदीप सोलंकी, राजेश यशवंत आंब्रे, बिपीन धोत्रे, दिपक जयंतीलाल लोढीया हे आरोपी धमकावून पैसे उकळत होते. मात्र, दिवसेंदिवस या गुंडांची पैशांची मागणी वाढतच होती. या मागणीला कंटाळून अखेर व्यावसायिकाने गुरू साटमला पैसे देणे बंद करून पोलिसात तक्रार नोंदवली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून विविध ठिकाणाहून या पाच जणांना अटक केली.
अारोपींपैकी शंकर हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आला आहे. तर भरत हा विविध डाॅनसाठी व्यावसायिकांना धमकावयाचा. राजेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ५० गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. बिपीन हा खंडणीतील पैसे परदेशात गुरू साटमपर्यंत पोहचवायचा. तर दिपक संबंधीत व्यावसायिकांची माहिती गुरू साटमला पुरवण्याचे काम करतो. शहरातील अन्य किती व्यावसायिक या टोळीच्या निशाण्यावर होते याचा आता पोलिस शोध घेत आहेत. या आरोपींविरोधात सबळ पुरावे गोळा केलेले आहेत. हे सर्व पुरावे आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी पुरेसे असल्याचे पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा -
धावती लोकल पकडताना प्रवाशाचा मृत्यू
घातक बाॅम्ब बनवण्याच्या प्रयत्नात स्फोट; दोन जण जखमी