वैभव राऊतने उघडला होता घातक शस्त्रांचा कारखाना

घातक शस्त्रे विकत घेण्याचा प्रयत्न केल्यास गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची भीती होती. त्यामुळे उत्तर भारतातून छुप्या पद्धतीने देशी कट्टे बनवणाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन या तिघांनी घरबसल्या घातक शस्त्रे बनवण्याचं काम सुरू केलं होतं. सामाजिक कामांच्या आड तिसराच हेतू साधण्याच्या तयारीत असलेल्या या तिघांच्या कटाची माहिती पोलिसांना वेळीच मिळाल्याने हे प्रकरण उघडकीस आलं.

वैभव राऊतने उघडला होता घातक शस्त्रांचा कारखाना
SHARES

राज्यात घातपाती कारवाईच्या प्रयत्नात असलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायकबाबी पुढे येत आहेत. महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथका(एटीएस) ने पुणे आणि नालासोपारा इथं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात घातक शस्त्र सामुग्री हस्तगत केली होती. त्यावरून वैभवने नालासोपाऱ्यात घातक शस्त्र बनवण्याचा कारखानाचं काढल्याचं तपासातून पुढं आलं आहे.

काय हस्तगत केलं?

या तिघांच्या चौकशीनंतर एटीएसने पुणे आणि नालासोपारा इथून रविवारी उरलेला शस्त्रसाठा हस्तगत केला. त्यामध्ये ५ देशी बनावटीची पिस्तुल, ३ अर्धवट पिस्तुल, ९ एमएमची ११ कार्टेजस, ७.६५ एमएमची ३० कार्टेजस, पिस्तुल बनवण्यासाठी लागणारे पार्ट्सही वैभवने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तर सुधन्वाच्या चौकशीतून एटीएसने पुणे इथं केलेल्या कारवाईत १ लॅपटाॅप, ५ हार्डडिस्क, ५ पेन ड्राइव्ह, ९ मोबाइल, अनेक सिमकार्ड. १ वायफाय डोंगल, १ कार, १ दुचाकी, आणि काही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा व पुणे, सातारा आणि नालासोपारा परिसराचा समावेश आहे.

उ. प्रदेशातून मार्गदर्शन

घातक शस्त्रे विकत घेण्याचा प्रयत्न केल्यास गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची भीती होती. त्यामुळे उत्तर भारतातून छुप्या पद्धतीने देशी कट्टे बनवणाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन या तिघांनी घरबसल्या घातक शस्त्रे बनवण्याचं काम सुरू केलं होतं. सामाजिक कामांच्या आड तिसराच हेतू साधण्याच्या तयारीत असलेल्या या तिघांच्या कटाची माहिती पोलिसांना वेळीच मिळाल्याने हे प्रकरण उघडकीस आलं.

१० पथकं कार्यरत

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्यभरात १० हून अधिक पथकं या प्रकरणाच्या तपासाच्या दृष्टीकोनातून कार्यरत आहेत. तर दुसरीकडे वैभव राऊत निर्दोष असल्याचं म्हणत एटीएसने चुकीची कारवाई केल्याच्या निषेधार्थ नालासोपारा येथील रहिवासी १७ आॅगस्ट रोजी भंडार आळी ते सिव्हिल सेंटरपर्यंत मूक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.

बंगळुरू एसआयटी पथक मुंबईत

बेंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या अमोल काळे यांच्याकडून कर्नाटकच्या एटीएसने हस्तगत केलेल्या डायरीत वैभव राऊतचं नाव आढळून आलं आहे. त्यामुळे कर्नाटक एसआयटीचं एक पथक सोमवारी मुंबईत दाखल झालं आहे. या पथकातील अधिकारी गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी या तिघांजवळ करणार आहे.

हेही वाचा-

सनातन संस्थेवर बंदी घाला, अशोक चव्हाण यांची मागणी

कोण आहे कट्टर हिंदुत्ववादी वैभव राऊत?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा