मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्यानंतर महाराष्ट्र सरकारने समुद्र सुरक्षेसाठी २००९ मध्ये १५ सी लेक बोटी न्यूझीलंडहून मागवल्या होत्या. या बोटींना आता ९ वर्ष पूर्ण झाली अाहेत. मात्र, या बोटींच्या मर्यादांमुळे समुद्रात गस्त घालणं कठीण जात होतं. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी नव्या हायस्पीड आणि अत्याधुनिक बोटींची मागणी राज्य सरकारकडे काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानुसार लवकरच 'इमिजिएट सपोर्ट व्हेईकल' बोटी मुंबईच्या समुद्रात गस्तीसाठी दाखल होणार आहेत.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या आठ वर्षांत सागरी सुरक्षेत फारशी प्रगती झालेली नाही. मुंबईसह राज्याला ७२० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला अाहे. पण या सागरी किनार्यांची सुरक्षा करण्याकरता फक्त २१ सागरी पोलीस ठाणे आहेत. मुंबई( ५), ठाणे ग्रामीण (५), रायगड जिल्हा (५), सिंधुदर्ग (६), रत्नागिरी (५) या ठिकाणी सागरी पोलीस ठाणे अाणि ३६ कोस्टल चौक्या अाहेत. त्यांच्याकडे एकूण मिळून २२ नौका आणि ७ स्पीड बोटींचा ताफा अाहे. मात्र, यातील बहुतांश नौका, स्पीड बोटी जुन्या अाणि नादुरुस्तच आहेत.
२००९ मध्ये मुंबई पोलिसांना १५ 'फास्ट पेट्रोलिंग सर्व्हिस' स्पीड बोटी देण्यात आल्या होत्या. या बोटींद्वारे पोलिस समुद्रात गस्त घालत होते. मात्र या बोटींची क्षमता कमी असल्यामुळे गस्त घालण्यात अडचणी येऊ लागल्या. या बोटी ताशी ३५ ते ४० किलोमीटर वेगाने जाऊ शकत असल्या तरी ५ नाॅटीकल मैल अंतरापेक्षा जास्त अंतर त्या जाऊ शकत नव्हत्या. तर उथळ समुद्रात तसंच ४ ते ५ तासांच्यावर त्या पाण्यात थांबू शकत नव्हत्या. याशिवाय १६ पेक्षा जास्त माणसे या बोटीतून जाऊ शकत नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेऊन सागरी सुरक्षा अधिक बळकट बनवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी राज्य सरकारकडे नवीन आणि अत्याधुनिक बोटींची मागणी केली होती.
या नव्या अत्याधुनिक इमिजिएट सपोर्ट व्हेईकल' बोटी 'राॅयल इन्स्टिट्युशन आॅफ नेव्हल आर्चीट' या कंपनीने तयार केल्या आहेत. लंडन बनावटीच्या या बोटींची क्षमता सागरी सुरक्षेसाठी महत्वपूर्ण आहे. या बोटीद्वारे २०० नाॅटीकल मैल खोल समुद्रात गस्त घालणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर ताशी २५ किलोमीटर वेगाने ही बोट धावणार असून या बोटीवर एकाच वेळी ३४ जण प्रवास करू शकतात. तसंच समुद्रात सात दिवस ही बोट थांबू शकते.
सध्या ही बोट ओएनजीसी आणि नेव्हीच्या अधिकाऱ्यांकडे आहे. ओएनजीसीने ही बोट पाच वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेतली असून त्याचे दिवसाचे भाडे १ लाख ७० हजार रुपये आहे. या बोटी लवकरच महाराष्ट्र पोलिस दलाला मिळणार असून त्यामुळे सागरी सुरक्षा अधिक बळकट होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली.
जुन्या बोटी समुद्रात खूप हेलखावे खातात. याशिवाय समुद्रातील खारे वातावरण अाणि प्रदूषणामुळे पोलिसांना गस्तीदरम्यान उलट्या, जुलाब अादी त्रास होतात. मात्र, नव्या बोटी वातानूकुलीत असल्यामुळे अशा प्रकारचा त्रास पोलिसांना होणार नाही.
हेही वाचा -
मानखुर्दमध्ये अल्पवयीन मुलीला लिफ्टमध्ये मारहाण
घटस्फोटीत महिलांना ठगवणारा अटकेत