मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या मुंबई बंदला दुपारनंतर हिंसक वळण लागल्याने मुंबई पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्या ४४७ आंदोलकांना ठिकठिकाणाहून ताब्यात घेतलं. मुंबईत एकूण ४५ ठिकाणी मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलने करण्यात आली. मात्र शहरातील काही भागात आंदोलन चिघळल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु पोलिसांनी वेळीच कडक भूमिका घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगडमध्ये बंद पुकारण्यात आला होता. या बंद दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या शेकडो आंदोलकांनी विविध ठिकाणी तोडफोड करत सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं. तर काहींनी पोलिसांवर देखील हल्ला केला. त्यामुळे शहरात ४५ ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली.
त्यानुसार पोलिसांनी आतापर्यंत ४४७ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून फरार आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. आंदोलकांनी आतापर्यंत २५ बेस्ट बस नुकासान केलं असून ठाणे, मानखुर्द आणि कळंबोलीत पोलिसांच्या गाड्या जाळून त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी कळंबोली आणि ठाण्यात प्लास्टिकच्या गोळ्या हवेत झाडण्यात आल्या. मुंबईतील मानखुर्द, दिंडोशी, गोरेगाव, कांदिवली या ठिकाणी आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली.
मराठा समाजाच्या आंदोलनात समाजकंटक घुसल्याच्या दावा ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला. याप्रकरणी २० जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. तर इतरांची धरपकड सुरू असल्याची माहितीही सिंग यांनी दिली.
मुंबईसह परिसरात दंगेखोरांनी केलेल्या उपद्रवाच्या डझनभर चित्रफीती व ध्वनीफिती पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यांच्या सहाय्याने संबंधीत व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे. अनेक ध्वनीफितींमध्ये समोरची व्यक्ती कुठे कुठे तोडफोड केल्याची माहिती देत आहे, दुकाने बंद करण्यासाठी धमकावत आहेत. त्यांची पडताळणी सध्या पोलिस करत असून त्याच्या सहाय्याने संबंधीत व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
हेही वाचा-
हिंसा नको चर्चा करा- मुख्यमंत्री
मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवा- अशोक चव्हाण