अंधेरी - बिहारचा सिंघम म्हणून ओळखले जाणारे शिवदिप लांडे यांनी मुंबईत येताच आपल्या नावाला साजेशी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सध्या त्यांच्यावर अमली पदार्थ विरोधी शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. पदभार स्विकारताच त्यांनी एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. सुनील धुतीया आणि विक्की नाडर अशी यांची नावे आहेत. दोघांकडून 30 लााखांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सुनील धुतीया हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. अंधेरीत त्याचा कुरियरचा व्यवसाय आहे.
अंधेरीतल्या इन्फीनिटी माॅलमधून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, या विभागाने शुक्रवारी रात्री या ठिकाणी सापळा लावला होता. अशातच एक एक्सयुव्ही गाडी या ठिकाणी आली. मात्र या गाडीतील दोघांची संशयास्पद हालचाल पाहून पोलिसांनी दोघांची चौकशी सुरू केली. मात्र या दोघांनी उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, मोठ्या प्रमाणांत एमडी ड्रग्ज असल्याचे आढळले. दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता कोर्टाने 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.