अंधेरीतील एका कार्यालयातील महिलांच्या चेंजीग रुममध्ये छुपा कॅमेरा लावून महिलांचे अश्लील चित्रीकरण करणाऱ्या ३५ वर्षीय कर्मचाऱ्याला सहार पोलिसांनी अटक केली आहे. गणेश नदागे असे या आरोपीचे नाव आहे. मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.
मरोळच्या एका खासगी कंपनीत गणेश हा मागील अनेक महिन्यांपासून हाऊस किपींगचे काम करत होता. त्यावेळी कुणाच्याही न कळत महिलांच्या चेंजींग रुममध्ये लक्ष न जाणाऱ्या ठिकाणी मोबाइल लपवून महिलांचे अश्लील चित्रीकरण तो करत होता. मंगळवारी या कार्यालयात एक महिला कपडे बदलण्यासाठी गेली असता तिच्या दृष्टीस हा मोबाइल पडला. कुणी तरी हा मोबाइल विसरून गेलं असावं, असा अंदाज बांधत तरुणी कंपनीच्या मॅनेजरकडे तो मोबाइल देण्यास जात होती. त्यावेळी मोबाइलचा कॅमेरा चालू असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने मोबाइलची गॅलरी पाहिली असता मोबाइलमध्ये तरुणीचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण दिसून आले. तिने तातडीने ही बाब मॅनेजरच्या लक्षात आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मॅनेजरने तो मोबाइल घेऊन सहार पोलिस ठाणे गाठले.
पोलिसांनी चौकशी केली. मात्र मोबाइल घेण्यास कुणीही पुढे येत नव्हते. त्यावेळी पोलिसांनी मोबाइलमधील नंबर आणि इतर महत्वाच्या गोष्टी पडताळून पाहिल्या असता तो मोबाइल गणेशचा असल्याचे लक्षात आले. गणेशला पकडायला पोलिस जाणार त्या आधीच कार्यालयातून गणेशने पळ काढला होता. पोलिसांनी गणेशला अंधेरीच्या लिंक रोड परिसरातून अटक केली आहे. मागील काही महिन्यांपासून अशा प्रकारे छुप्या पद्धतीने महिलांचे चित्रीकरण करत असल्याची कबुली त्याने दिली आहे. या प्रकरणी सहार पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -
पराभवाचा सूड घेण्यासाठी महिलांचे फोटो अमेरिकन बेवसाइटवर टाकले