जखमी प्रवाशाला उचलण्यासाठी गेलेल्या हवालदाराचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंधेरीमध्ये घडली. एस. व्ही. पाटील असे हवालदाराचे नाव असून, ते अंधेरी रेल्वे स्टेशनवर रात्रपाळीस होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे येथे अंधेरी रेल्वे स्टेशन मास्तर सोनावणे यांनी अनाऊन्स करून कळवले की, एक इसम जखमी झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी स्टेशन मास्तर सोनावणे आणि चार हमाल गेले होते. त्यांच्यासोबत एस. व्ही. पाटील हे देखील होते. जखमींचा शोध घेत असताना डाऊन थ्रू विरार जलद लोकल गाडीची धडक हवालदार पाटील यांना लागली आणि ते जखमी झाले. त्यांना तात्काळ कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टर्सनी त्यांना मृत घोषित केले.