''दिव्याखाली अंधार'' ही म्हण सर्वांनाच ठाऊक अाहे. मात्र या म्हणीचा उत्तम नमुना सध्या ओशिवरातील आयएएस आणि आयपीएस अधिकारी रहात असलेल्या मीरा टाॅवरमध्ये समोर आला आहे. या अधिकाऱ्यांच्या इमारतीत चक्क वेश्याव्यवसाय चालत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पण ही गोष्ट समाजाला कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आणि प्रशासन चालवण्याचे धडे देणाऱ्या आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांनाच ठाऊक नसल्याने राज्यभरातील गुन्ह्यासंदर्भात नेमकी काय स्थिती असेल? याची कल्पनाच न केलेली बरी!
मुंबईतील ओशिवरा भागातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची बहुचर्चित 'मीरा टॅावर' ही इमारत पुन्हा एकदा वादात सापडली आहे. ओशिवराच्या 'मेगा माॅल' परिसरातील मीरा टाॅवरच्या शॅाप नं १ मधील 'थाई रिच स्पा'मध्ये अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांना मिळाली.
त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस निरीक्षक आशा कोरके, पोलिस नाईक महेश नाईक, राजेंद्र पेडणेकर आणि विकास सावंत यांनी सापळा रचला. बुधवारी रात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्पा सेंटरवर केलेल्या कारवाईत पोलिसांना ५ महिला अश्लील कृत्य करताना आढळून आल्या.
त्यानुसार पोलिसांनी शॅाप मॅनेजर रजनीश शर्माला अटक करत, ५ महिलांची सुटका केली. या स्पा सेंटरमधून पोलिसांनी ४ हजार ६५० रुपयांची रोख हस्तगत केली आहे. शाॅपचा मालक रोहित रंजन याच्यासह रजनीश शर्मा विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
न्यायालयाने शर्माला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून शाॅपचा मालक रोहित रंजनचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती ओशिवराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी दिली.
याच इमारतीत ९ जानेवारी २०१४ बेस्टचे तत्कालीन महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता रहात असलेल्या 'सी' विंगमधील १५ व्या माळ्यावरील फ्लॅटमधून पोलिसांनी ब्ल्यू फ्लिमच्या तब्बल २ लाखांहून अधिक सीडी हस्तगत केल्या होत्या. हा फ्लॅट त्यावेळी गुप्ता यांनी मुखर्जी नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिल्याची माहिती वृत्तवाहिनींना दिली होती.
तर, २ जून २०१४ साली मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. सत्यपाल सिंग यांच्या वर्सोव्यातील घरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याची चर्चा पोलिस दलासह राजकीय वर्तुळात रंगली होती. या प्रकरणानंतर स्वतः केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांनी खुलासाही केला होता.
या दोन घटनांनंतर देखील पुन्हा याच इमारतीतील स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याने या रॅकेटमागचा 'गॅाडफादर' कोण? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
हेही वाचा-
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
अभिनेत्री झायरा वासिम विनयभंगप्रकरणी विकास सचदेवला जामीन