मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फारुख देवडीवाला (४८) याला दुबई सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलं आहे. फारुख हा पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या फैझल मिर्झा याचा नातेवाईक आहे.
फैझल एकेकाळी अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील यांचा विश्वासू सहकारी होता. भारतातून होणाऱ्या सोने तस्करीची जबाबदारी डी कंपनीने फारूखवर सोपवली होती. त्याचबरोबर भारतात घातपात घडवण्यासाठी येणाऱ्यांची व्यवस्था दुबईत करण्याची जबाबदारीही त्याच्याकडे होती.
१९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर फारुख परदेशात पळून गेला. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते. देशातील वाॅटेंड आरोपींपैकी तो एक असून त्याच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) सूचनेरून ‘इंटरपोल’ने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
फारुख मुंबई आणि इतर शहरांमधील तरुणांची दहशतवादी कारवायांसाठी भरती करत होता. तो दुबईतल्या शारजा या ठिकाणी या तरूणांच्या राहण्याची व्यवस्था करायचा. मुंबई, गुजरात आणि उत्तर प्रदेशात दहशतवादी कारवाई करण्यासाठी तो तरूणांना तयार करत होता.
फारूख ऐकेकाळी दाऊदसाठी गुजरातमधील अवैध धंदे देखील संभाळायचा. त्याच्याविरोधात ‘पोटा’ कायद्यांतर्गत अहमदाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एटीएसने अटक केलेल्या फैजल मिर्झाला मुंबईहून शारजाला जाण्यासाठी विमान तिकीट फारुखनेच पाठवलं होतं.
एटीएसने अटक केलेल्या फैझलला शारजा इथं बोलावून फारूखने त्याची राहण्याची व्यवस्था केली. शारजाला राहिल्यानंतर मिर्झा कराचीला गेला होता. पण त्याचे तिकीट आणि व्हिसा थेट कराचीचा नव्हता. त्याचं तिकीट कराचीमार्गे दुसऱ्या देशात जाणाऱ्या विमानाचं होतं. पण मिर्झाला त्याच्या म्होरक्यांनी कराचीत उतरण्यास सांगितलं.
कराचीत उतरल्यावर मिर्झाला कोणत्याही कायदेशीर अडचणी आल्या नाहीत. त्यामुळे या प्रकरणात पाकिस्तानातील स्थानिक यंत्रणांनींही दहशवाद्यांना मदत केली, हे स्पष्ट होत आहे.
याप्रकरणी आरोपींना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ने मदत केल्याचं म्हटलं जातं. या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर फारूखचा मूळ चेहरा उघडकीस आल्यामुळे दुबई सुरक्षा यंत्रणांनी त्याला अटक केली.
हेही वाचा-
पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेल्या एकाला अटक
आयएस, इंडियन मुजाहिद्दिन, अंडरवर्ल्ड भारताविरोधात एकवटले