मालाडमध्ये फ्लेमिंगोची शिकार! सहा जण ताब्यात


मालाडमध्ये फ्लेमिंगोची शिकार! सहा जण ताब्यात
SHARES

 मालाड इथल्या जनकल्याण नगर परिसरातील पाणथळ जागेत १० जुलैला बंदुकीच्या सहाय्यानं फ्लेमिंगोची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्या दिवसापसून अर्थात गेल्या पाच दिवसांपासून कांदळवण कक्षाचे अधिकारी या शिकार करणाऱ्यांच्या मागावर होते.

अखेर पाच दिवसांनंतर फ्लेमिंगोची शिकार करणारे सहा जण शरण आले असून कांदळवण कक्षानं त्यांना ताब्यात घेतलं आहे.  त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया आणि चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशांत देशमुख, परिक्षेत्र अधिकारी, पश्चिम क्षेत्र, कांदळवण कक्ष यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.


शिकाऱ्यांवर वचक नाही

मुंबईत येणाऱ्या परदेशी पाहुण्यांची अर्थात फ्लेमिंगोची शिकार करण्याचं प्रमाण मुंबईत वाढत चाललं आहे. फ्लेमिंगोचं गुलाबी मटण खाण्यासाठी फ्लेमिंगोची शिकार केली जात अाहे. फ्लेमिंगोच्या शिकारीला अाळा घालण्याचे प्रयत्न प्राणीमित्रांसह कांदळवण कक्ष आणि पोलिसांकडून होत आहेत. पण तरीही म्हणावा तसा वचक फ्लेमिंगोची शिकार करणाऱ्यांना बसत नसल्याचं चित्र  मालाड येथील शिकार प्रकरणातून समोर आलं आहे.


सायबेरीया, अफ्रिकेतून अागमन

गुजरात, सायबेरीया आणि अफ्रिकेतून हिवाळ्यात आॅक्टोबर-नोव्हेंबरच्यादरम्यान परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो मुंबईच्या पाणथळी जागी, खाड्यांवर येतात. आॅक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगोचं वास्तव्य मुंबईत असतं. तर फेब्रुवारीनंतर काही प्रमाणात फ्लेमिंगो मुंबईत असतात. पण जुलैनंतर हळूहळू फ्लेमिंगो मायदेशी अंडी घालण्यासाठी परतात. दरम्यान अतिशय देखण्या अशा या फ्लेमिंगोंना जवळून पाहण्याची मजा काही औरच असते. त्यामुळंच शिवडी, माहुल, एेरोली इथं मोठ्या संख्येनं मुंबईकर खास फ्लेमिंगो पाहायला गर्दी करतात.


मटणासाठी शिकार

दुसरीकडं मात्र या फ्लेमिंगोची शिकार होत असल्याचं चित्र आहे. फ्लेमिंगोचं मटण पाणथळ परिसराच्या वस्त्यांमधील लोक मोठ्या प्रमाणात खातात. तर या मटणाला गुलाबी मटण म्हटलं जातं. त्यामुळंच फ्लेमिंगोच्या शिकारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक शिकार १० जुलैला मालाडमध्ये होत असल्यासंबंधीचे फोटो एका पक्षीमित्र संस्थेनं कांदळवण कक्षाला पाठवत त्यासंबंधीची तक्रार केली होती. त्यानंतर कादंळवण कक्षानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिकाऱ्यांचा माग घेण्यास सुरूवात केली.


शिकारी शरण 

या शोधमोहिमेचा धसका घेत अखेर सहा शिकारी रविवारी शरण आले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हेमंत भंडारी, भोपेत त्र्यंबक भंडारी, मंगेश भंडारी, राकेश भंडारी, सागर प्रमोद लाड आणि मॅटोग मायकल रेसेस अशा या सहा जणांची नाव आहेत. हे सहाही जण चारकोप इथं राहत असल्याचं समजतं. देशमुख यांच्यासह पी. पी. ठाकुर, जगन्नाथ साळवे, डी. जे. मुटके, एच. आर. साठे, आर. एल. गायकवाड आणि के. आर. हरीजान यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. दरम्यान हे सहाही जण कांदळवण कक्षाच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे.


अशी आहे शिक्षा

फ्लेमिंगोची शिकार ही वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मधील शेड्युल ४ अंतर्गत गुन्हा मानला जातो. त्यानुसार हा गुन्हा करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची तरतूद असून आरोप सिद्ध झाल्यास ३ वर्षापर्यंतची शिक्षा तर २५ हजार रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.



हेही वाचा -

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ७ ठार

पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला भररस्त्यात लुटलं



 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा