नाशिकच्या शस्त्रास्त्र प्रकरणातील मुख्य आरोपी सुकापाशाच्या अटकेनंतर आता त्याचे वडील अकबर पाशाला खंडणीच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
बाप-बेट्याच्या या जोडगोळीने शिवडीतील एका व्यापाऱ्याला पैशांसाठी धमकावलं होतं. मात्र या दोघांच्या धमकीला बळी न पडता त्या व्यापाऱ्यानं याप्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अकबरला गुरुवारी सकाळी अटक केली. आता या बाप बेट्यांवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
नाशिक शस्त्रास्त्र प्रकरणात अटकेत असलेला सुकापाशा यापूर्वी जयपूर जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्यावेळी जामिनावर त्याची सुटका झाली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर आपली दहशत कायम ठेवण्यासाठी सुका आणि अकबर हे वारंवार त्या व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावत होते. पण त्या व्यापाऱ्याने त्यांच्या धमकीला न घाबरता आरए किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत सुका आणि त्याचे वडील अकबर पाशाविरोधात भादंवि कलम ३८५, ३८७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा करणार आहे.
अकबरला हत्यारांच्या तस्करीप्रकरणी मुंबई पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती.१९९५ मध्ये त्याच्याविरोधात किडवाई मार्ग पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला होता. याशिवाय वडाळा टीटी आणि किडवाई मार्ग पोलिसांनी अकबरकडून परदेशी बनावटीचे पिस्तुल, एक रिव्हॉल्व्हर, २ सुरे हस्तगत केले होते.
मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात माता रमाबाई मार्ग पोलिसांनी अकबरला अटक केली होती. त्याचे अनेक नातेवाईक पाकिस्तानात आहेत. त्याने त्याच्या मुलीचं लग्न पाकिस्तानी युवकाशी लावून दिलं आहे. त्यामुळे अकबर अनेकदा पाकिस्तानला जाऊन आल्याचं सांगितलं जातं. वडाळा टीटी पोलिसांना एका गुन्ह्यात अकबरचे पाकिस्तानातील 'एके-४७' हाती घेतलेलं छायाचित्र सापडलं होतं. त्याच्यावर मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांत १० हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून पोलीस त्याची माहिती गोळा करत आहेत. सुका पाशा याला त्याच्या साथीदारांसह नुकतीच नाशिक पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे २२ रायफल, १७ रिव्हॉल्व्हर आणि ४ हजार १४२ काडतुसे सापडली.
परिसरातील एका स्थानिक व्यक्तीला सुकापाशा आणि त्याचे वडील अकबर पाशाने पैशांसाठी धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
- अजय सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खंडणी विरोध पथक
हेही वाचा -