सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एक नवीन टिव्स्ट समोर आला आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची जवळची मैत्रिण रिया चक्रवर्तीवरच आता संशय घेतला जात आहे. सुशांतला प्रेमात अडकवून त्याच्याकडून पैसे उकळून याला आत्महत्येस प्रवृत केल्याचा आरोप आता रियावर केला जात आहे. या प्रकरणी बिहारच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात रिया विरोधात तक्रार नोंदवण्या आली आहे. ही तक्रार दुसरी तिसरी कुणी नसून सुशांतच्या वडिलांनी केली आहे.
हेही वाचाः- PUBG गेमवर बंदी? जाणून घ्या PUBGचा चायनाशी संबंध
मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी १४ जून रोजी सुशांतने गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४० जणांचे जबाब नोंदवले असून तपास सुरू आहे. असे असतानाच बिहारमध्ये राहणाऱ्या सुशांतच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या आत्महत्येला थेट सुशांतची जवळची मैत्रिण रिया चक्रवर्तीला जबाबदार धरले आहे. सुशांतचे वडिल कृष्ण किशोर सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१९ मध्ये रिया सुशांतच्या आयुष्यात आली. त्यावेळी तो कोणत्याही मानसिक तणावात नव्हता. ज्यावेळी सुशांत मानसिक तणावाखाली उपचार घेत होता. त्या डाॅक्टरांकडे रियाने त्याला नेले होते. त्यामुळे डाॅक्टरांनी उपचाराच्या नावाखाली त्याला कोणती औषध दिली याची चौकशी होणे गरजेचे आहे. सुशांत आणि रिया हे मागील अनेक महियांपासून एकत्र रहात होते. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी म्हणजेच ६ जून रोजी रिया त्याला सोडून निघून गेली. घर सोडून जाताना रियाने सर्व महत्वाच्या वस्तू, लॅपटाॅप, क्रेडिटकार्ड आणि सुशांतवर सुरू असलेल्या उपचाराचे पेपरही सोबत नेले. तसेच तिने सुशांतला मोबाइलवर ब्लाॅक केले होते. त्यामुळे सुशांत प्रचंड मानसिक तणावाखाली गेला होता. त्याच्या बँकेच्या स्टेटमेंटनुसार मागील एका वर्षात सुशांतच्या खात्यातून तब्बल १७ कोटी रुपये खाते कोटक बँकेच्या खाते क्रमांक १०११९७२५९१ यावर वळवण्यात आले आहे. या खात्यातून पुढे १५ कोटी रुपये अज्ञात खात्यावर गेले आहेत. याची पोलिसांनी चौकशी करायला हवी, हे पैसे रियाने तिच्या जवळच्या व्यक्तीच्या खात्यावर वळवल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे.
हेही वाचाः- नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ३२० रुग्ण
तसेच सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यानंतरच त्याच्या कामावर परिणाम झाला आणि त्याला चित्रपट मिळत नव्हते. सुशांत केरळमध्ये आँर्गेनिक शेती करणार होता. त्यासाठी तो त्याचा मित्र महेशसोबत जागा पाहण्यासाठी जाणार होता. ही गोष्ट रियाला कळाल्यानंतर तिने त्याला जाण्यापासून रोखले. तसेच हा व्यवसाय न करण्यासाठी भाग पाडले. ऐवढेच नाही तर सुशांतने ऐकले नाही. तर त्याच्यावर सुरू असलेल्या उपचाराचे पेपर प्रसारमाध्यमांमध्ये वायरल करण्याची धमकी तिने दिल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. सुशांत मानसिक तणावाखाली असताना आत्महत्येच्या दोन दिवसांपूर्वी गोरेगाव येथे राहणाऱ्या त्याच्या बहिणीने त्याची समजूत काढली होती. त्यावेळी त्याने तिच्याजवळ रिया मला कुठल्यातरी प्रकरणात अडकवेल अशी भिती व्यक्त केली होती. अनेकदा रियाने सुशांतला त्याच्या घरातल्यांपासूनही दूर ठेवल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी केलेल्या आरोपानुसार मुंबईचे पोलिस या आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपीची चौकशी न करता, ज्या लोकांचा या प्रकरणाशी थेट संबध नाही अशाकडे चौकशी करत असल्याचा आरोपही सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. या प्रकऱणी बिहारचे चार पोलिस अधिकारीही चौकशीसाठी मुंबईला येणार असल्याचे सांगितले जाते.