सीएसटी - विनातिकीट प्रवास करणाऱ्या आयकर अधिकाऱ्याने सीएसटी स्थानकातील टीसीलाच मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. गेल्या काही दिवसांत टीसीवर हल्ला होण्याची ही चौथी घटना आहे. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या आयकर अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म १४ व १५ च्या प्रवेशद्वाराजवळ टीसी एस. के. गुप्ता कार्यरत होते. त्यांनी ऋषीकुमार सिंह नावाच्या प्रवाशाकडे तिकिटाची विचारणा केली. मात्र सिंग यांच्याकडे तिकीट नसल्याने टीसीने सिंह यांना दंड भरण्यास सांगितले. मात्र दंड भरण्यास सांगताच आपण आयकर खात्याचे अधिकारी असल्याची बतावणी त्यांनी केली. तसेच टीसीसोबत वाद घालत दंड भरण्यास नकार दिला. वाढलेला वाद हमरीतुमरीवर आला आणि सिंह यांनी टीसी गुप्ता यांच्या कानाखाली मारली. त्यानंतर गुप्ता यांच्या मदतीला अन्य टीसी आले. त्यांनी सिंग यांना टीसींच्या कार्यालयात येण्यास सांगितले. मात्र त्यांनी त्यालाही नकार दिला. अखेर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना बोलावून त्यांना लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.